🌟वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या - आर.एस.नरवडे🌟एक लाख रुपये थेट कर्ज योजना आणि २५ टक्के बीज भांडवल कर्ज योजना सुरु🌟

परभणी, दि.२५ (जिमाका) :  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रर्वगातील वंचित होतकरू तरुण-तरुणी तसेच नवउद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज  व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना आणि २५ टक्के बीज भांडवल कर्ज योजना सुरु असून, इच्छुकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा ही १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत असून, अर्जदार हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षादरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून, संबंधित व्यवसायाचे कोटेशन, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी मूळ कागदपत्रे महामंडळाच्या VJNT.IN संकेतस्थळावर अद्यावत करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० ते ५० लाख रुपयांपर्यंत असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी कायदा २०१३ च्या अंतर्गत नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील असावे, गटातील सदस्य १८ से ४५ वयोगटातील असावा, गटातील लाभार्थ्यांची कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल स्कोर किमान ५०० इतका असावा, उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीलेअर करिता ८ लाख मर्यादित असावी. ही योजना ऑनलाइन असून याकरिता तहसिल रहिवासी, डेमोसाईल, गटाचे पॅन कार्ड, संबंधित व्यवसायाचे कोटेशनची इतर सर्व मूळ कागदपत्रे महामंडळाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार तसेच ७/१२ वर बोजा नोंद करून देणे आवश्यक असून या योजनेसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (रु.१ लाखापर्यंत), रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह संबंधित व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे, उत्पन्नाचे, रहिवाशी, वयाचा पुरावा आणि डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातून मूळ जातीचा दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास अर्ज मिळतील. आणि २५% बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाचा सहभाग २५ % यास महामंडळाची नियमावली राहील व राष्ट्रीयकृत बँक सहभाग ७५ % यास बँकेची नियमावली राहील, असे एकूण ५ लाख रुपयांपर्यंत मर्यादा असून अर्जदारांनी महामंडळाकडे मूळ आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत कार्यालयात दाखल करावी लागतील. यापूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातून मूळ जातीचा दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळतील.

या सर्व योजनेचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट्ये प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या VJNT.IN या संकेतस्थळाला भेट द्यावी व अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी दूरध्वनी क्र. ०२४५२-२३४५३७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या