🌟संत शिरोमणी गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडे तालुक्यातील लोणी टाकळी येथे झाला🌟
संतशिरोमणी गुलाबराव महाराज हे संतभूमी महाराष्ट्रात होऊन गेलेले एक प्रतिभावान मराठी लेखक होते. तसेच ते विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. त्यांचे सर्व आयुष्य ग्रामीण भागात गेले, तेही फक्त चौतीस वर्षांचे! अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी १३४ ग्रंथ लिहिले. त्यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही!" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला होता. त्यांचे गुणगौरव करणारा श्री. के. कुमार जी. निकोडे गुरुजींचा हा विशेष लेख...संपादक
संतशिरोमणी गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे, तालुका लोणी टाकळी येथे दि.६ जुलै १८८१ रोजी झाला. तेव्हाचे ते सन १९१५ या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात सुशिक्षित भारतीयांना पाश्चात्त्य विचारांनी जखडले होते. भारतातील शास्त्रे, कला, साहित्य, जीवनपद्धती अशा सर्वच बाबी त्या लोकांना अर्थहीन वाटत होत्या. भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. याच काळात पाश्चात्त्य विचारसरणीतील उथळपणा आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व केवळ बुद्धिवादाच्या आधारे विचारवंतांना पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य त्यांनी अर्भकावस्थेतच केले. त्यांचा जीवनपट विलक्षण आहे. मातृवियोगानंतर सहा वर्षे बडनेराजवळ असलेल्या लोणी टाकळी येथे त्यांचे वास्तव्य होते. घरातील वातावरण पूर्णपणे प्रतिकूल. आठव्या महिन्यातच आजाराने डोळे गेले म्हणून आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले? हा प्रश्न सामान्य माणसाला निश्चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञान, धर्म-अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायन शास्त्र, वैद्यक शास्त्र, विविध कला विषय, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ असा एकही विषय राहिला नाही की ज्यावर गुलाबराव महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर उत्तरेकडचे व बंगालकडचेही जे मोठे विद्वान त्यांच्या संपर्कात आले. ते सर्व त्यांची अलौकिक प्रतिभा पाहून थक्क होत. त्यांच्या शुद्ध आचरणाला व अगाध ज्ञानाला भुलून लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.
ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी पंडित यांनी इ.स.१९६४पर्यंत चालविला. मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संतश्री गुलाबराव महाराज एकदा ख्यातनाम मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथालयात विशिष्ट विषयांवरील कुठले ग्रंथ आहेत? या जिज्ञासेपायी त्यांनी ग्रंथपालांना विचारणा केली. तो महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथांची विचारपूस करते म्हणून त्या सर्वच लोकांना कुतूहल वाटले. सहकाऱ्याने महाराजांना ग्रंथांची नावे सांगणे सुरू केले. बहुतांश ग्रंथ महाराजांना माहीत होते. या ग्रंथांचा क्रम कसा लावावा? हे महाराज त्या त्या ग्रंथातील सारांशाच्या आधारे त्यांना सांगत होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. चौकशीअंती त्यांना समजले की अत्यंत सामान्य दिसणारी ही व्यक्ती म्हणजे मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आहेत. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी व मराठी भाषा तथा वर्हाडी बोलीतूनही त्यांनी ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले. त्यांत २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादींचा समावेश आहे. त्यांची प्रसिद्ध ग्रंथसंपदा- १) अलौकिक व्याख्याने, २) धर्म समन्वय, ३) प्रेमनिकुंज, ४) योगप्रभाव, ५) संप्रदाय सुरतरु, ६) साधुबोध आदींच्या रूपात आहे. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. "भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत," असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ.पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम व संत रामदास यांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन त्यांनी आपल्या अल्पशा आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुलरचे व लोकमान्य टिळकांचे मत महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त- हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. मधुराद्वैत- मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.
संतश्री गुलाबराव महाराजांनी अकोल्याच्या एका चित्रकाराकरवी संत ज्ञानेश्वरांचे एक चित्र तयार करून घेतले होते. याच आधारे नंतर माउलींचा फेट्यातील समाधिस्थ बसलेले चित्र विविध चित्रकारांनी साकारले. ते चित्र आजही याच मंदिरात अग्रभागी लावण्यात आले आहे. त्यांच्या ग्रंथसंपदेत अत्यंत दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. या ग्रंथसंपदेची संख्या दोन हजाराहून अधिक आहे. शांकरमत-मंडण भामती, चित्सुखी, अद्वैतसिद्धी, खंडण खंड खाद्यम, बायबल, कुराण, प्लेटो, हेगेल, मायर्स, डार्विन, स्पेन्सर अशी मोठी ग्रंथसंपदा आहे. अशा असंख्य विषयांवरचे ग्रंथ त्यांनी अभ्यासले. ते आत्मसात केले व त्यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देणारी ही ग्रंथसंपदा याच मंदिरात आज कपाटबंद आहे. या ग्रंथांना हात लागणार नाही, याची पुरेपूर काळजी या मंदिर व्यवस्थापनाने घेतली आहे, हे विशेष! अल्पायुष्य काळात महाराजांनी एवढे ज्ञान कसे प्राप्त केले? याचे उत्तर पूर्ण समाधानकारक नसले तरी ते अल्पसे या ग्रंथ दर्शनातूनच मिळते. छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. खरे पाहता हे ज्ञानेश्वर मंदिर बुद्धिवान तरुणांच्या वर्दळीचे स्थान असायला हवे. मात्र स्थिती तशी नाही!
संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी पुणे येथे भाद्रपद शुद्ध त्रयोदशी दि.२० सप्टेंबर १९१५ रोजी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी नश्वर देहाचा त्याग केला. त्यावेळी त्यांनी सांगितले, "माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन!"
!! पावन पुण्यतिथी निमित्त त्यांच्या अलौकिक प्रज्ञाचक्षूंना साष्टांग नमन !!
श्री.के.कुमार जी.निकोडे गुरुजी.
(भारतीय सत्पुरुषांचे चरित्र अभ्यासक व साहित्यिक.)
C/o- वंद. राष्ट्रसंत तुकडोजी चौक,
मु. रामनगर- गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३
.
0 टिप्पण्या