🌟'आत्मा’चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी स्विकारला ॲवार्ड🌟
परभणी (दि.१२ सप्टेंबर २०२३) : राज्य शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा ‘जैविक इंडिया ॲवार्ड 2023’ इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा, नवी दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने ‘आत्मा’चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी पुरस्कार स्विकारला. कृषी विभागांतर्गत ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
इंटरनॅशनल कॉम्पीटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर, बेंगळुरू यांच्याकडून सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यात येते. सेंद्रिय व नैसर्गिक शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या विशेष कार्य करणाऱ्या शासकीय संस्था, अशासकीय संस्था, शेतकरी, समूह, कंपन्या यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील ‘जैविक इंडिया ॲवार्ड’ देण्यात येतो.
विदर्भातील आत्महत्या, नैराश्यग्रस्त अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा या 6 जिल्ह्यात वर्ष 2018-19 पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत 9 हजार 268 शेतकऱ्यांचे 15 हजार 682 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. योजनेअंतर्गत 20 हेक्टर क्षेत्राचे 435 गट स्थापन करण्यात आले असून, त्या गटांच्या 40 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण 2.82 कोटी भागभांडवल जमा झाले आहे. योजनेअंतर्गत 12 किरकोळ विक्री केंद्र, 17 समूह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून, हा ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.
दि. 27 जून रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ कार्यक्षेत्र विस्तारून संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली असून, योजनेचा कालावधी सन 2027-28 पर्यंत वाढविण्यात आला आहे. योजनेअंतर्गत तीन वर्षात राज्यात 13 लाख हेक्टर व सेंद्रीय शेतीखाली आणावयाचे आहे. समूह संकल्पनेद्वारे 18 हजार 820 उत्पादकगट व 1 हजार 825 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवरील संशोधन व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ‘आत्मा’ चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे....
*****
0 टिप्पण्या