🌟पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ...!


🌟असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे🌟

परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२३) : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर देण्यात येतो. या पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.  

महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना त्यांच्या कार्याला दाद द्यावी तसेच त्यांना पुढे काम करण्यास प्रेरणा मिळावी. त्या कामाची प्रशंसा होऊन महिला व बालकांच्या उन्नतीसाठी इतर समाजसेविका व संस्थांनी पुढाकार घेण्यासाठी राज्य शासनाकडून हा पुरस्कार जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर देण्यात येतो. सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीतील पुरस्कारासाठी इच्छुक समाजसेविका, संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

राज्य, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ वर्षे  तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी कमीत कमी १० वर्षे कार्य केलेले असावे आणि विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था, पब्लिक ट्रस्ट १९५० किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार पंजीबद्ध असावी तसेच संस्थेचे महिला व बालविकास क्षेत्रातील सेवा व कार्य ७ वर्षाहून जास्त असावे.

यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार अथवा दलित मित्र पुरस्कार मिळालेला नसेल, अशा महिला समाजसेविका या पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करू शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाशी संबंधित नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तिगत मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही.तरी परभणी जिल्ह्यातील पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षासाठीचे प्रस्ताव जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यात १४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत चार प्रतीत सादर करावेत.

* प्रस्ताव स्वीकृतीचे निकष खालीलप्रमाणे :- 

राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ वर्षे कार्य केलेले असावे. विभाग स्तरावरील पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थांनी महिला व बाल विकास क्षेत्रात ७ वर्षांपेक्षा अधिक कार्य केलेले असावे. जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असावे. सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ पैकी कोणत्या वर्षासाठीचा प्रस्ताव आहे  ते नमूद करावे. जिल्हास्तर, विभाग स्तर किंवा राज्यस्तर यापैकी जे असेल ते नमूद करावे. वैयक्तिक ओळखपत्र, विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस प्राधिकरणाचे पत्र आणि सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्रांसह हे प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावांच्या अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या