🌟नांदेड शहराच्या शहीदपुरा भागात नैसर्गिक नाल्यावर बांधलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार...?


🌟महानगर पालिका आयुक्तांचे तक्रारकर्त्यास आश्वासन🌟

नांदेड (दि.०३ आगस्ट २०२३) - महानगरपालिके अंतर्गत असलेल्या शहीदपुरा भागातील एका नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले भव्य अशा इमारतीचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची तक्रार अमरजीतसिंग गिल यांनी केली होती. ह्या बांधकामासंदर्भात त्यांनी औरंगाबाद खंडपीठातही याचिका दाखल केली होती. अखेर महापालिकेच्या आयुक्तांनी त्यांना संबंधित इमारतीवर लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले.

वजिराबाद क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत संबंधित इमारतीचा अनधिकृत बांधकामाचा पंचनामा करून महापालिकेने पुढची कारवाई करण्यास विलंब लावला होता. तक्रारकर्त्याने अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर चार आठवड्याच्या आत इमारत मालकास लेखी उत्तर देण्याचे आदेश दिलेले होते. संबंधित इमारत मालक मनोहरसिंग फत्तेसिंग मल्होत्रा यांनी न्यायालयाच्या आदेशाचेही पालन केले नाही.

अखेर बुधवार दि. दोन आगस्ट रोजी तक्रारकर्ते अमरजीतसिंग गिल यांनी महापालिकेत येऊन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली. आणि त्यांनी संबंधित इमारतीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे सातव्या मजल्याचे काम सुरू असणाऱ्या इमारतीवर महापालिका खरंच हातोडा टाकणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या