🌟महसूल सप्ताहानिमित्त ‘युवा संवाद’चे आयोजन विद्यार्थ्यांना दोन दिवसात ३१२ प्रमाणपत्रांचे वाटप🌟
🌟शिवाजी महाविद्यालय,शारदा महाविद्यालय आणि ज्ञानोपासक महाविद्यालयाचा सहभाग🌟
परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२३) : सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. काळाची पावले ओळखून त्यासोबत चालणाऱ्यांचेच भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्यांनी मोबाईल पाहण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्त तहसील कार्यालयाने शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित शहरातील शिवाजी महाविद्यालय, शारदा महाविद्यालय आणि ज्ञानोपासक महाविद्यालयातील विद्यार्थी ‘युवा संवाद’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉ. अमित घाडगे, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, लक्ष्मीकांत खळीकर, सतीश पाठक, श्रीमती अनिता वडवळकर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे आर. के. गुजर आणि ई-गर्व्हन्ससचे प्रमुख कपिल पेंडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत आयोजित ‘युवा संसद’ कार्यक्रमात शहरातील तीनही महाविद्यालयातील ३१२ विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालय ७५, तर शारदा महाविद्यालय आणि ज्ञानोपासक महाविद्यालयातील २३७ अशी एकूण ३१२ प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनो, सध्याचे तुमचे दिवस हे अभ्यासाचे व करिअर घडविण्याचे आहेत. सोशल मीडियाचा वापर आपण करिअर घडविण्यासाठी करा. परंतु मोबाईलमध्ये अनावश्यक व्हिडिओ पाहून आपला वेळ वाया घालवू नका, असे कळकळीचे आवाहन करताना महसूल विभागाच्या सर्व सेवा सीएससी अंतर्गत असतील किंवा इतर सर्व ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याबाबतही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आवाहन केले.
महसूल सप्ताहात रहिवासी प्रमाणपत्र, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी निवडणूक मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांची सर्व प्रमाणपत्र व महसूल विभागाबाबतची माहिती याबाबत संवाद साधला. कपिल पेंडलवार यांनी सीएससी केंद्र तसेच तहसील कार्यालयातून निर्गमित करणाऱ्या प्रमाणपत्राविषयी माहिती दिली. तर नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांनी ई-पीकपाहणी सातबारा आणि सलोखा योजना यावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक आर. के. गुजर यांचेही समायोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ.अमित घाडगे यांनी केले. तर सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण साखरे, रवी काळे, श्रीमती शहाणे, एकनाथ बुलबुले, श्री. गिरी आणि महा-ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी आदित्य बाकळे, सचिन शेटे, अंगद सावंत यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या