🌟परभणी जिल्ह्यातील अतिजोखमीच्या मुलींचे समाजाने घ्यावे पालकत्व - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟जिल्हास्तरीय बालविवाह निर्मूलन कृतीदलाच्या आढावा बैठकीत त्या संबंधित यंत्रणेशी बोलत होत्या🌟


परभणी (दि.१८ जुलै २०२३) : जिल्ह्यात बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अतिजोखीम गटात मोडणाऱ्या मुलींचा शोध घेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन समाजाने त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बालविवाह निर्मूलन कृतीदलाच्या आढावा बैठकीत त्या संबंधित यंत्रणेशी त्या बोलत होत्या.  

मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) राजेंद्र तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, डॉ. किशोर सुरवसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास‌ तिडके, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे, बालविकास प्रकल्प अधिकारी अरविंद आकांत, अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा कौशल्य विकास उपायुक्त प्रशांत खंदारे, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित, प्राचार्या जया बंगाळे, बाल कल्याण समिती सदस्य वनिता काळविट, दत्ता भुजबळ, अर्चना मेश्राम, रविंद्र कात्नेश्वरकर, जिल्हा समन्वयक संदिप बेंडसुरे, विकास कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी आणि बालविवाह निर्मूलन कृती दलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 

'बालविवाह मुक्त परभणी अभियान राबवित असताना बालविवाह होणाऱ्या मुलींमध्ये अतिजोखीम घटकांतील किशोरवयीन मुलींचा समावेश जास्त आहे. भविष्यात बालविवाह होऊ नये किंवा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिजोखीम घटकांतील मुलींना समाजाच्या प्रवाहामध्ये ठेवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. म्हणून 'बालविवाह मुक्त परभणी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार असून त्यामध्ये अतिजोखीम घटकांतील मुलींची यादी संकलित करण्यात येणार आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये ठेवण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानामध्ये शासन आणि समाज यांनी एकत्रितपणे चळवळ उभी करावी, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले.

‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियानाच्या दुसऱ्या टप्यात अतिजोखीम घटकांतील मुलींची संख्या यादी व आवश्यक माहिती संकलित करण्यात येईल. यातील मुलींना शरीरिक, मानसिक व भावनिक सहाय्य देण्याचे काम संबंधित विभागाकडून करून घेण्यात येईल. मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करून सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल. तसेच या टप्प्यात मुलींच्या अधिकारावर भर देण्यात येणार आहे. 

परभणी जिल्हा बालविवाह मुक्त करणे, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी व जाणीव जागृती करणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ पोहचविणे, अतिजोखीम घटकांतील मुलींना विकासाच्या, शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या प्रवाहात ठेवणे, अतिजोखीम घटकांतील मुलींना सामाजिक पालकत्व प्रदान करणे, मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ करणे तसेच शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे, अतिजोखीम घटकांतील मुलींना आवश्यक त्या योजनेचा लाभ देणे, भावी पिढी सक्षम बनविणे, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी व बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी सक्षम कार्यक्रमांतर्गत युवतींमध्ये ७ कौशल्य (सुशिक्षित, अनुभवी, कुशल, समान व सुरक्षित, हकदार, उद्यमशील आणि मुक्त) विकसित करणे आणि बालविवाह निर्मूलन चळवळ निर्माण करणे व तिचे बळकटीकरण करणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले.

पुढील महिन्यात शाळाबाह्य मुलींची संबंधित विभागांनी माहिती घेऊन ती जिल्हास्तरीय बालविवाह निर्मूलन समितीच्या सदस्यांना द्यायची आहे. या मोहिमेमध्ये एकाही शाळाबाह्य मुलीची नोंद सुटता कामा नये. यादीनुसार प्रत्येक मुलीची नोंद झाल्याची खात्री करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी जून महिन्यातील विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली भविष्यात आपल्या गावात-परिसरात बालविवाह होणार नाहीत, याची समाजाने जबाबदारी घ्यावी. त्यासाठी गावातील दर्शनी भागात या मुलींची जबाबदारी घेण्याबाबत जनजागृती करावी, असे श्रीमती गोयल यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील अतिजोखीम अशा विविध सात गटातील मुलींबाबत माहिती देण्यात आली. त्यामध्ये शाळाबाह्य मुली, स्थलांतरीत होणा-या कुटुंबातील मुली, एक किंवा दोन पालक गावलेल्या मुली, घरात यापूर्वीच एखादा बालविवाह झालेल्या कुटूंबातील मुली, कुटुंबात जास्त मुलींची संख्या, ऊसतोड किंवा वीट भट्टीवर जाणा-या कामगारांच्या मुली आणि कौंटुंबिक कलहाला बळी पडलेल्या मुलींचा अतिजोखीम गटात समावेश होतो. अशा ४८८० मुलींची जिल्हा यंत्रणेकडे नोंद झाली असून, समाजाने या गटातील मुलींचे शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य सावरण्यासाठी पालकत्व घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले. समाजासोबतच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या मुलींची मदत करणे आवश्यक असून, त्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने काम करावे, असेही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या