🌟जन्म आणि मृत्यू विशेष : ब्रह्मज्ञानी मृत्यूला घाबरत नाही.....!


🌟"जमणा मरना मरना जमणा इस बन्दे दी रीत बणी..मोह माया दे जालच फसया ना रब नाल प्रीत बणी..!🌟  

       _सृष्टीचे नियम सर्व जीवांना बंधनकारक आहेत. येथे जो निबजला, अंकुरला किंवा जन्मास आला, तो एक दिवस नष्ट, नाहिसा किंवा मृत्यू पावणारच आहे. कितीही मिनतवारी केली, कितीही हातपाय घट्ट रोवले तरी सुद्धा! आजपावेतो कोणीही महाबली, महायोगी निसर्ग नियमाविरुद्ध दंड थोपटू शकलाच नाही. मी तर एक सामान्य जीवजंतु, एक पापी, तापी, कोपी, निच, हलकट, पामर, आणि अवलक्षणी माणूस आहे. मी मनुष्ययोनीत जन्माला आलो, म्हणून काय मी गब्बर, भूपती, अजर-अमर, चिरंजिव किंवा मृत्युंजय झालो का? नाही ना? मीसुद्धा वेळ येताच गचकणार, मरणार अर्थात या आकर्षक, मनमोहक आणि सुंदर जगाचा निरोप  घेणारच आहे; ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून विद्यमान समर्थ सद्गुरुला शरण गेल्याने चौर्यांशी लक्ष जीव योनीचा फेरा अर्थात जन्ममृत्यूचे  चक्र खंडित होऊ शकतो. अशी आध्यात्मिक माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या शब्दसाधनेतून जरूर वाचा.... संपादक._

       "जमणा मरना मरना जमणा इस बन्दे दी रीत बणी|

       मोह माया दे जालच फसया ना रब नाल प्रीत बणी|

       करमां धरमां दे नाल एह रब ना मिलया ना मिल सकदा ए|

       दिल दा कंवल गुरु दे बाझों ना खिलया ना खिल सकदा ए|

       उस नही मरना अमर हो गया जिसदा रब नाल नाता ए|

       कहे अवतार बचन ए पूरा मुरशद तों रब जाता ए|"

(पवित्र सम्पूर्ण अवतार बाणी: पद संख्या ३१२.)

       हिंदू धर्म हा हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणं यांना मानवी जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणं सर्वश्रेष्ठ मानली जातात. यांनी माणसाच्या आयुष्यात विविध गोष्टी शिकवल्या आहेत. या पुराणात मानवी जीवनातील सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सारं काही या पुराणात सामावलेलं आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत सारं सारं यात आहे. 

     भगवान विष्णू यांनी आपलं वाहन गरुड याला सांगितलं ते गरुड पुराण असे म्हणतात. या गरुड पुराणात मानवाच्या मृत्युनंतर काय होते हे सांगितलं आहे. मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल! आयुष्यातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य म्हणजे मृत्यू. पण या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर काय याचे विवेचन या गरुड पुराणात दिले आहे. गरुड पुराण हे काही फक्त मरणोपरांत काय हे सांगत नाही तर, जिवंतपणी पण कसं वागावं? हे पण सांगतं. शहंशाह बाबा अवतारसिंहजी महाराजांनी ब्रह्मज्ञानाचे दीपक हाती घेऊन जीवनात मृत्यूपर्यंतचा मार्ग चोखाळण्यास समजावितात-

     "मौत दे राह विच जित्थे बन्दे धुंद गुबार हणेरा ए।

     ज्ञान दी जोती पास जे तेरे चानण रस्ता तेरा ए।

     जिन्हां अपना गुरु रिझाया मनया एहदा भाणा ए।

    कहे अवतार उन्हां दे पल्ले असली नाम खजाना ए।"

[पवित्र सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र. १५०.]

     इतर सर्व पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. गरुड पुराणात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्ये सांगितली आहेत, असं नाही. तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे. इतर पुराणं कधीही वाचू शकतो, परंतू हे गरुड पुराण मात्र घरातील कुणी माणूस मेल्यानंतर म्हणजे सुतक पाळतात तेव्हाच वाचलं जातं. एरवी हे पुराण कधीही वाचू नये, असा संकेतसुद्धा आहे. अगदी गरुड पुराण घरी ठेवूही नये, अशीही मान्यता आहे. हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितले आहेत, त्यातील अंत्येष्टी या एकमेव विषयाशी संबंधित गोष्टी या पुराणात सांगितलेल्या आहेत. अंत्यसंस्कार, त्यातील विधी आणि मरणानंतर काय आहे. आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे सगळं गरुड पुराणात आहे. गरुड पुराणात एकूण १९००० श्लोक आहेत. हे दोन खंडात विभागले आहेत. पहिला खंड पूर्व खंड आणि दुसरा उत्तर खंड मानला जातो. मेल्यानंतर आत्म्याचा प्रवास, माणसाला त्यानं केलेल्या पापकर्मानुसार काय शिक्षा मिळतात? हे या सर्व श्लोकात सांगितले आहे. यमराज मेल्यानंतर काय काय शिक्षा देतात? हे गरुड पुराण सांगतं. आत्मा निघून गेल्यावर काय होतं? माणूस मरतो..‌ आपल्यासाठी त्याचं मरण अकस्मात असतं. पण त्या माणसाला मरण जवळ आल्याची सूचना यमराज काही विशिष्ट लक्षणांनी देतात. त्याची एकंदरीत १० लक्षणं सांगितली आहेत. संतोक्ती सुद्धा दुजोरा देवून सांगते-

      "अरे अरे मना गुंतू नको मायाजाळी!

       काळ आला जवळी ग्रासावया!!"

       हिंदू‌ धर्मात शरीर हे वस्त्र मानलं जातं, ते जीर्ण झालं की आत्मा ते शरीर त्यागतो म्हणजेच माणूस मृत्यू पावतो. आत्मा शरीरातून बाहेर पडतो. मग आपल्या रिवाजाप्रमाणे शरीराचं दहन केलं जातं. एकदा बाहेर पडलेला आत्मा पुन्हा शरीरात येऊ शकत नाही. पण त्याला आता कसलीही बंधनं नसतात. तो कुठेही जाऊ शकतो. मेल्यानंतर सात दिवस आत्मा त्याच्या आवडत्या गोष्टी, आवडत्या ठिकाणी जातो. ज्या गोष्टींवर त्याचं अतोनात प्रेम असतं तिथे थांबतो, असे सांगितले आहे.

        आपण जगरहाटी जाणतोच की जन्म झाला तर आनंदोत्सव साजरा होतो आणि मृत्यू झाला तर दुखवटा पाळला जातो. आनंदाला संक्षेपाने तर दुःखाला दीर्घरूपाने गणले जाते, कवी लिहितो-

   "एक धागा सुखाचा,

    शंभर धागे दुःखाचे।"

खरेच, जीवनात एवढे मोठे प्रदीर्घरूपाचे दुःख असतात काहो? मुळीच नसतात, परंतु, माणसाची समज तशी होते. 'वितभर आहे, त्यास हातभर' समजण्याची. जीवनात सदोदित समाधानी वृत्ती किंवा स्थिरता आणणे अत्यावश्यक असते.

       जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवांचा जो जगण्यासाठी आटापिटा, खटाटोत आणि कष्टप्रद प्रयत्न चालू असतात ना, त्यालाच जीवांचे जीवन म्हटले जाते. माझा जन्म झाला आहे, तो पुढे कधीतरी मरण्यासाठीच आहे, असे म्हणणे काही गैर नाही. मृत्यू कधी ओढवेल, याची आपणास शाश्वती नाही, पण मी मरणार आहे, हे नक्की! सद्या मी मृत्यच्या दिशेने चालत जाणारा मृत्यूमार्गावरचा प्रवासी आहे. येथे 'मी- मी' म्हणणारा मात्र मी शरीरच आहे, असे समजणारा मायेत लिप्त असा आत्मा  आहे. परंतु मी म्हणतो की मी अजर अमर आत्मा आहे, मी परमपिता परमात्म्याचा अंश आहे. मी मरणार नाही, मरेल ते फक्त माझे नश्वर शरीर. जीर्ण झालेल्या कपड्यांप्रमाणे मी आत्मा जीर्ण-शीर्ण शरीर त्यागतो आणि नवीन करकरीत शरीर पुन्हा धारण करतो, असे आध्यात्मिक ज्ञान सांगतं. आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच आत्मा, परमात्मा, जीव, माया यांच्याविषयीचे सखोल ज्ञान असते, त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान हे वर्तमान समर्थ सद्गुरुच्या आशीर्वादाशिवाय प्राप्त करताच येत नाही. समर्थ रामदास स्वामींनी म्हटले-

         "ज्ञान म्हणजे आत्मज्ञान| पहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||" 

          आज जगाच्या पाठीवर अवतरित वर्तमान समर्थ सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज समस्त मानव परिवारास ब्रह्मज्ञान वाटत आहेत. आपणही यावे आणि ही अमूल्य देणगी आपल्या पदरी पाडून धन्य व्हावे. सुर दुर्लभ असे नरजन्म सार्थक करावे. संतोक्ती हवाला देते-

         "मानुष जनम अति दुर्लभ है होत न बारंबार!

          पका फल जो भुई गिरे, लगे न दुजी डार!!

         म्हटले जाते, की मानवाला जीवनात सदैव मृत्यूचे स्मरण होत असावे. का? त्यामुळे तो नेहमी माणुसकी धर्माचे आचरण करत राहील. असे आचरण कसे काय करू शकेल? तर संत महात्मे निर्देश देतात, की विद्यमान समर्थ सद्गुरुला शरण जावे. समर्थ सद्गुरू हे सुख कोठे? दुःख कोठे? जन्म काय? मृत्यू काय? आत्मा कोण? परमात्मा कोण? माया कोण? मी कोण? कोठून आलो? कोठे जाणार? या व अशा शंकांचे निराकरण नक्कीच करतात. सद्गुरूच्या चरणांवर मी गेलो तेव्हाच मी तेथेच ठार मेलो. माझ्यातील ठासून भरलेला मीपणा- अहंकार व सर्व अवगुण- अवलक्षण गळून गेले. मृत्यूचे भय पळून गेले. सद्गुरू चरणांवर विश्वास दृढ झाले आणि त्याचे अष्टौप्रहर गुणगान करण्यात मन तल्लीन झाले आहे. माझ्या सद्गुरुने माझ्या जन्म-मरणाचे चक्र भेदले आहे. मला अमरपदी बसविले आणि माझे मृत्यूभय संपविले आहे. म्हणून मी निश्चिंत झालो आहे. मृत्यू येवो कि मृत्यूचा बाप येवो, मला त्याची पर्वा नाही. माझा नरजन्म सार्थक झाला. आता यापेक्षा अधिक काय हवे? मानवी जीवनात ब्रह्मज्ञान अत्यंत महत्वाचे कसे? ते संत शिरोमणी युगदृष्टा सद्गुरुबाबाजी हरदेवसिंहजी

महाराजांनी कोरून ठेवले आहे-

      "ब्रह्मज्ञानी तो आत्मा परमात्मा को जान रहा।

       छोड के ये घर जिस घर जाना उस घर को पहचान रहा।

       पांच तत्वों का पांच तत्वों में मिल जाना ही मौत है।

      एक सांस का जाकर वापस न आना मौत है।

     सच है कायम दायम सच का काल नही कुछ कर सकता।

     मरना तो बस झूठ ने है सत्य  कभी न मर सकता।

     ब्रह्मज्ञानी को मौत का ये भेद समझ में आता है।

     इसीलिये तो मौत का डर उसको नही सताता है।

     कहे 'हरदेव' ब्रह्मज्ञानी तो मर कर भी न मरता है।

     मुक्ति का पद पाता है वो मिलती उसे अमरता है।"

[पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.२८२.]


श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी. 

रामनगर, गडचिरोली.

फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या