🌟जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड केलेल्या गावांचे पाण्याच्या ताळेबंदानुसार आराखडे तात्काळ सादर करावेत...!


🌟हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आवाहन🌟

हिंगोली (दि.11 जुलै 2023) : जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 73 गावांचे पाण्याच्या ताळेबंदानुसार गाव आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश मांजरमकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी एच. ए. कटके, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0), गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना, अमृत सरोवर योजना व जलशक्ती अभियानाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 3 प्रकल्पाची कामाबाबत तात्काळ कार्यवाही करावी. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत 15 धरणावरील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामांचे सर्व अभिलेखे दाखल करावेत. तसेच अमृत सरोवर अभियानातंर्गत जिल्ह्याची प्रगती समाधानकारक आहे. त्याअनुषंगाने कामांचे जीओटेंगिंग करावेत. जलशक्ती अभियान अंतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विभागीय वन अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या