🌟परभणी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ई-ग्रंथालय प्रणालीचे उद्घाटन....!


🌟उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते करण्यात आले🌟 

परभणी (दि.१९ जुलै २०२३) : जिल्ह्यातील एनआयसीमार्फत ग्रंथालयीन सेवेसाठी तयार करण्यात आलेली ई-ग्रंथालय प्रणाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात प्रस्थापित करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक,नागनाथ लटपटे, रूपेश मोरे, अजय वट्टमवार, सचिन गायकवाड, वाचक व ग्रंथालय पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक पी. एन. पणीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वाचन दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रणालीमार्फत अनिल बोरडे आणि प्रमोद खापरे या वाचकांना श्री. हुसे यांच्याहस्ते ऑनलाईन सभासद ओळखपत्र देऊन प्रणालीमार्फत ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच वाचनालयातील नियमित वाचकांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. हुसे यांनी ई-ग्रंथालय प्रणाली वाचकांसाठी एक आधुनिक सुलभ पद्धती असल्याचे सांगून या प्रणालीमुळे वाचक व कर्मचाऱ्यांचा वेळ वाचून ग्रंथ देवघेव सोप्या व जलद गतीने होण्यास मदत होईल. आधुनिकतेची कास पकडून सर्व ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालयीन सेवा आधुनिक करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यालयात लावलेल्या डिजिटल भित्तीपत्रकाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय ग्रंथालयात सुमारे ६८ हजार ग्रंथ उपलब्ध असून, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन ग्रंथाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या