🌟कृषी विषयक योजनांच्या माहिती व तक्रारीचे निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार हेल्पलाईन नंबरचा वापर करावा..!


🌟असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने केले आहे.🌟

हिंगोली (दि.18 जुलै 2023) : राज्याचे सरासरी पर्जन्यमान 1 जून ते दि. 17 जुलै या कालावधीचे 389.1  मिमी असून  या खरीप हंगामात दि. 17 जुलै, 2023 पर्यंत  प्रत्यक्षात 294.60 मिमी ( दि. 17 जुलै, 2023  जुलै पर्यंतच्या सरासरीच्या 76 टक्के) एवढा पाऊस पडलेला आहे. 17 जुलै पर्यंत असणाऱ्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये 52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के,  136 तालुक्यामध्ये 50 ते 75 टक्के तर 109 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झालेला असून 58 तालुक्यांमध्ये 100 टक्के पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेला आहे. 


 खरीप हंगामातील राज्याचे  सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि. 17 जुलै, 2023  अखेर प्रत्यक्षात 88.44 लाख  हेक्टर (62 टक्के) पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापूस व सोयाबीन या पिकाचा विचार करता या दोन्ही पिकाखालील असणा-या क्षेत्राच्या तुलनेत सरासरी 83 टक्के पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग येत आहे. या मध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

खरीप हंगाम 2023 करीता 19.21  लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78  लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 19 लाख 21 हजार 445  क्विंटल (100 टक्के) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

 खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 48.34 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 21.31 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 27.03 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.  

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग असून दिनांक 17 जुलै 2023 पर्यंत 66.05 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला असून विमा संरक्षित क्षेत्र 42.30 लाख हेक्टर एवढे  आहे. खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 कृषीविषयक योजनांच्या  माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्‍यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने केले आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या