🌟हिंगोली जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागाशी सामंजस्य करार करावा...!



🌟जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे उद्योजकांना आवाहन🌟

हिंगोली (दि.14 जुलै 2023) : जिल्ह्यातील उद्योजकांनी जर संबंधित विभागाशी सामंजस्य केला तर जिल्ह्यातील बेरोजगारांना स्थानिक ठिकाणी नोकरी मिळणे शक्य होईल. तसेच उद्योजकांनाही स्थानिक स्तरावर आवश्यक तितके मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे  सर्व उद्योजकांनी  सामंजस्य करार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. 

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार व नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील उद्योजकांचा सहभाग मिळविण्यासाठी सामंजस्य करार करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभाग अंतर्गत कौशल्य, रोजगार व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक दि. 11 जुलै, 2023 रोजी घेण्यात आली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी एस.एन.जाधव, हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेचे सचिव प्रवीण सोनी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.आर.केंद्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि.प्र.रांगणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  आर. व्ही.बोथीकर, जि.एस.टी. कार्यालयाचे ए.एन. वसमतकर, जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक एस.ए.कादरी, माविमचे व्ही.बी.जगताप यांच्यासह नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी दि. 01 जुलै ते 31 जुलै, 2023 दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण आणि उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यातील युवक-युवतींना मागणीवर आधारीत कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी युवक युवतींना कोणत्या क्षेत्रातील कौशल्यामध्ये रुची आहे हे जाणून घेण्यासाठी https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 या लिंकच्या माध्यमातून गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म, लघू आणि मोठ्या उद्योगामध्ये कुशल अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोल निहाय आवाश्यक कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या आभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करण्यासाठी उद्योजकांसाठीही https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9 या लिंकवर गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणामध्ये जिल्ह्यातील युवक युवतींनी व उद्योजकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने वेळोवेळी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण करुन दिल्या जातात. या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांचा समावेश वाढविण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व प्रथम कौशल्य रोजगार व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे सचिव तथा सहायक आयुक्त डॉ. रा.म. कोल्हे यांनी सांमजस्य कराराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध उद्योजकांनी आपल्या उद्योजकामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाबाबत माहिती दिली. यावर उद्योजकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत करार करण्याबाबत संमती दर्शवली.या बैठकीसाठी समितीतील सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या