🌟परभणीत जिल्हास्तरीय दूरचित्रवाणी संनियंत्रण समितीची बैठक संपन्न....!


🌟समितीच्या अध्यक्ष श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न🌟 

परभणी (दि.१८ जुलै २०२३) : जिल्हास्तरीय स्थानिक खाजगी दूरचित्र वाहिनी (केबल नेटवर्क) संनियंत्रण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी तथा खाजगी दूरचित्रवाहिनी संनियंत्रण समितीच्या अध्यक्ष श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक पी. एम. राठोड तसेच समितीचे सदस्य परभणी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सतीश जोशी, कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. संगीता अवचार, सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी येथील संदीप बेंडसुरे आणि समिती सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यावेळी उपस्थित होते.   

तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये सदर केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिल्या.

जिल्ह्यातील स्थानिक केबल ऑपरेटरमार्फत प्रसारित होत असलेल्या स्थानिक व सॅटेलाईट वाहिन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित केवल ऑपरेटर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालय अथवा सक्षम प्राधिकारी यांना किमान पाच केबल जोडण्या मोफत देणे आवश्यक आहे. जेणेकरुन सदर वाहिन्यावरुन प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील स्थानिक वाहिन्यांबाबत जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी असतील, तर त्या त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पहिला मजला, शासकीय इमारत, परभणी येथे सादर कराव्यात. तसेच प्राप्त तक्रारी समितीसमोर ठेवण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव अरुण सूर्यवंशी यांनी दिली.  या बैठकीत आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरातीबाबत एकही प्रकरण दाखल झाले नसल्याचे सांगून खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सामग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चा उद्देश आणि कार्यक्षेत्र याची माहिती श्री. सूर्यवंशी यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या