🌟राजकारण.....आधी पहाटे-मग सायंकाळी,आता निवडली दुपार..!


🌟असेच असते का राजकारण ?🌟

✍️ कवी :- राजेंद्र काळे

आधी पहाटे-मग सायंकाळी,

आता निवडली दुपार..

अशा अवकाळी शपथविधीने,

उरली-सुरली गेली पार !

कुणालाच नसतो थांगपत्ता,

उघडते जेव्हा राजभवन..

पुरोगामी असणाऱ्या राज्यात

लोकशाहीचेच सुरु हवन!

कोण खुले-कोण कोमजे,

बघा यांचा चेहरा..

सह्याद्रीचे सिंह ठरतात,

दिल्लीश्वरांचा मोहरा !

चर्चा सुरू आणण्याची,

समान नागरी कायदा..

कोण सत्तेत-कोण विरोधक,

नेत्यांचा समान फायदा !

सामान्यांनाच नितीनियम,

नेत्यांनी कुठेही वाकावं..

मतदार ठरतात मेंढरं,

कुणीही येऊन हाकावं !

मूल्याधिष्ठित राजनिष्ठांचे,

रचले जात आहे सरण..

कळत नाही-वळत नाही,

असेच असते का राजकारण ?


✍️ कवी :- राजेंद्र काळे

       बुलडाणा ९८२२५९३९२३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या