🌟महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी ‘डीपीडीसी’च्या त्या याद्यांना दिली स्थगिती....!


🌟शिवसेना शिंदे गटाचा कामांवर तीव्र आक्षेप : लवकरच योग्य तो तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन🌟

परभणी (दि.25 जुलै 2023) : परभणी जिल्हा वार्षिक योजना 2023-2024 अंतर्गत परभणी शहर व जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर विकास योजनांकरीता उपलब्ध निधीतून शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शिफारशी पूर्णतः वगळून योजनांचा निधी भारतीय जनता पक्ष तथा इतर तत्सम व्यक्तींना वाटप केल्याबद्दल आपण तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीपीडीसीच्या त्या याद्यांना तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती शिवसेनेचे महानगराध्यक्ष प्रविण देशमुख यांनी दिली.


      शहरासह जिल्ह्यातील नगरपालिकांना सर्वसाधारण 55 कोटी 64 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्यात शिवसेनेने (शिंदे गट) केलेल्या शिफारशींपैकी एकाही कामाचा समावेश नाही, अशी खंत शिवसेनेचे महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सादर केलेल्या निवेदनात शहरासह जिल्ह्यातील  पालिकांना वाटप केलेल्या कामांसह निधीच्या वितरणात शिवसेना पक्षाबरोबरी दुजाभाव हा वेदना देणारा आहे, अशी तीव्र खंत व्यक्त केली. जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यादीस तात्काळ स्थगिती बहाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या गोष्टीची मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेवून परभणी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून जिल्हा नियोजन समितीच्या त्या याद्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

          दरम्यान, लवकरच यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिलासाशी बोलतांना दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या