🌟भारतीय तत्त्वज्ञान या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार....!


🌟या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून 2021 वर्षाचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात आला🌟

वाशिम (दि.18 जुलै 2023) - मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांच्या भारतीय तत्त्वज्ञान या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून 2021 वर्षाचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात आला. 

डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी 2020 या वर्षी भारतीय तत्त्वज्ञान या पुस्तकाचे लेखन केले होते. सदर पुस्तकाचे लेखक म्हणून  दि. 17 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. 

आपल्या सत्काराला उत्तर देत डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय तत्त्वज्ञान हा अबोध आणि अवघड विषय असल्याचा बाऊ केला जातो. परंतु भारतीय तत्त्वज्ञाना इतके सोपे तत्त्वज्ञान दुसरे नाही. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये केवळ ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म याच गोष्टीचा अभ्यास केला जातो असे नाही. भारतीय तत्त्वज्ञानात मूल्य संस्कार, आत्म कल्याण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि याचबरोबर जीवनाची व्यवस्था आखण्यासंबंधीचे विचार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मागच्या काही दशकांमध्ये भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर म्हणावे तसे लिखाण झाले नसल्याचे दिसून आले म्हणून आपण भारतीय तत्त्वज्ञान हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ. डोणगावकर म्हणाले. हे पुस्तक लिहीत असताना त्यांनी वेद, उपनिषद, सूत्र ग्रंथ, त्रिपीटक, जैनांचे मूळ साहित्य, भगवद्गीता अशा मूळ आणि प्राचीन साहित्याचा अभ्यास केला. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्या महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे, प्राचार्य व प्राध्यापक यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार, ज्येष्ठ लेखिका प्रा. माधवी कवी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.  साहेबराव नीगळ, रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गायधने यांच्यासह तत्त्वज्ञान विषयाचे अनेक प्राध्यापक आणि तत्त्वज्ञान प्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या