🌟हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात....!


🌟अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले🌟

हिंगोली (दि.22 जुलै 2023) :  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी, वीज,औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी  यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, आजारी उद्योग पुनर्वसन, जिल्हा निर्यात प्रचालन समितीची  बैठक आयोजित करण्यात आली  होती.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.कादरी, एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता एस. सी. सावजी, उद्योग निरीक्षक वर्षा बोराळकर, अग्रणी बँकेचे अधिकारी  धनाजी  बोईले, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनीचे अभियंता यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच उद्योजक या बैठकीस उपस्थित होते. 

यावेळी  जिल्हाधिकारी  जितेंद्र  पापळकर यांनी  हिंगोली औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी  पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. यासाठी राज्यस्तरीय उद्योग मित्र समितीमार्फत पाठपुरावा करुन मान्यता घेण्याची कार्यवाही करावी. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील औद्योगिक क्षेत्राचे तसेच वसमत येथे महामंडळाचे अतिरिक्त औद्योगिक स्थापन करण्यासाठी हयातनगर फाटा येथील औद्योगिक क्षेत्राचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. त्यासही उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ड्रायपोर्टचा प्रस्ताव राज्यस्तरावर अंतिम मान्यतेसाठी पाठविला आहे त्यास अंतिम मान्यता प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. 

हिंगोली औद्योगिक क्षेत्रासमोरील औंढा रोडवरील अतिक्रमण काढण्याबाबत व उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. तसेच हिंगोली औद्योगिक क्षेत्राचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने स्वतंत्र ट्रान्सफार्मर तात्काळ बसवावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. त्याअनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करुन सप्टेंबर अखेरपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करावा. स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण करावेत. औद्योगिक क्षेत्रातील अविकसित भूखंडधारकांना नोटीसा देण्यात यावेत. जे भूखंडधारक लाभ घेणार नाहीत अशा भूखंडधारकाकडून विशेष मोहिम राबवून नियमानुसार भूखंड काढून घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केल्या. 

यावेळी जिल्ह्यातील  हिंगोली, कळमनुरी, वसमत शहरातील औद्योगिक क्षेत्र  वाढविण्यासाठी  लागणारा भूसंपादन,  सेनगाव व औंढा तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाबाबत कार्यवाही करणे, तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच जिल्हा विकास आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या