🌟खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा (दि.01 जुलै 2023) : समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या अपघात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाणा बस अपघात प्रकरणी वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी बसच्या अपघाताची आरटीओ विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. अपघात टायर फुटून झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली. यावेळी डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आरटीओने दिला आहे. समृध्दी महामार्गावर मोठ्या वाहनांनी तिसऱ्या लेन मधून जाणं अपेक्षित असतानाही बस दुभाजकावर आदळली. याचा अर्थ चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत नागपूर ग्रामीण आरटीओचे निरीक्षक राहुल धकाते यांनी नोंदविले. सोबतच वाहकांची ब्रेथ अनालयझरने तपासणी करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी केली जात असून वाहक नशेत असेल तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रॅथ अनालयझार तपासणी करणे गरजेचे असल्याचंदेखील धकाते यांनी स्पष्ट केलं.
* विदर्भ ट्रॅव्हल्स बस चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल :-
आरटीओच्या प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाला अटक केली. वाहनचालक दानिश शेख इस्माईल शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी 304, मोटर व्हेईकल ऍक्ट 134, 184, 279 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून 25 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आला आहे.
* समृद्धी महामार्गावरील सर्वात भीषण अपघात :-
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती. मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली. या अपघातानंतर बसने पेट घेतला, त्यानंतर लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. अक्षरशः या प्रवाशांचा जळून कोरपा झाला आहे.. त्यामुळे समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण असा अपघात असल्याचं सांगितलं जातंय......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या