🌟औद्योगिक आस्थापनावरील कामगार महिलांच्या समस्यांचा महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगिता चव्हाण यांनी घेतली माहिती....!


🌟राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगिता चव्हाण यांनी त्यांच्या औद्यागिक आस्थापनेवर प्रत्यक्ष भेट दिली🌟


परभणी (दि.18 जुलै 2023) : परभणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनावर काम करणाऱ्या महिला कामगारांची त्यांच्या औद्यागिक आस्थापनेवर प्रत्यक्ष भेट देवून राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी कामगार महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.

परभणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत मे. इटको स्पिनर्स सुतगिरणी, मे.मोती प्रोडक्ट्स व मे.शिवम मसाले या औद्योगिक आस्थापनांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच या आस्थपनावर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक आस्थापनेत महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. तसेच ज्या ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती गठीत केलेली नाही, त्या ठिकाणी येत्या 15 दिवसात समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महिला कामगारांना शासनाने विविध सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीचे पालन सर्व खाजगी आस्थापनांनी करणे गरजेचे आहे. ज्या कारखान्यात/आस्थापना मध्ये महिला कामगारांची संख्या जास्त असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तसेच वापरलेले पॅड नष्ट करण्याची मशीन, पाळणाघर तसेच स्वतंत्र शौचालयासह विश्रांतीसाठी खोली असणे बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, गरोदरपणातील रजा यातील येणाऱ्या अडचणी समजून घेवून याबाबत उपाययोजना करण्याविषयीदेखील त्यांनी सूचना दिल्या.

यावेळी ॲड. चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान महिलांना समान काम, समान वेतन, कामगारांच्या कौटूंबिक व जीवनावश्यक आरोग्याच्या गरजा, तक्रारी, शिक्षण तसेच कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या पाळणाघरांची प्रत्यक्ष पाहणी करुन विविध सूचना दिल्या. तसे न झाल्यास कामगार कार्यालयास तक्रार प्राप्त होताच संबधित आस्थापनावर कायदेशीर खटले दाखल करण्यात यावे अशा सुचना ॲड. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सरकारी कामगार अधिकारी वि.न.माणगावकर, जिल्हा समन्वयक वनिता चव्हाण, श्रीमती फरजाना शेख, शॉप इन्सपेक्टर अ.मु.सौदागर, सु.ज.पेरके यांच्यासह इतर संबधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या