🌟संत जनाबाई अजूनही उपेक्षितच - प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये


🌟संत जनाबाई यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये बोलत होते🌟

गंगाखेड (प्रतिनिधी):  'अजूनही संत जनाबाई उपेक्षितच आहेत' अशी खंत प्रा.डाॅ.विठ्ठल खं.जायभाये यांनी व्यक्त केली.संत जनाबाईमहाराजांच्या जन्म स्थळ असलेल्या गंगाखेड येथील अंबिका मंदिरात आयोजित संत जनाबाई यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये बोलत होते.

 सकल भावसार समाज संस्था मराठवाडा व गंगाखेड भावसार समाज यांच्या वतीने यावर्षी पहिल्यांदा संत जनाबाईंच्या पुण्यतिथीचे आयोजन गंगाखेड येथील संत जनाबाई जन्म स्थळी असलेल्या मंदिरात करण्यात आले होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमासोबत प्रा.डॉ.जायभाये यांचे प्रवचन आयोजित केले होते. प्रवचनात विद्रोही संत जनाबाईंच्या अभंग आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना तत्कालीन एकाही संतांने जनाबाई यांच्यावर एक अभंगसुद्धा लिहिला नाही. दुसरीकडे मात्र सर्वच्या सर्व संतांची चरित्रे जनाबाईंनी आपल्या अभंगातून लिहिली. एवढे मोठे उदात्त मातृभाव घेऊन जनाबाई संतत्वाला पोहोचल्या. नामदेवांना कडे-खांद्यावर खेळवले, ज्ञानदेव-मुक्ताबाईचे अश्रू पुसले. सावतोबा, चोखोबा, बंकोबा यांना आधार दिला. जनाबाई सर्व संत मांदियाळीत जेष्ठ होत्या आणि सुदैवाने त्यांना पांडुरंगाने श्रेष्ठत्व बहाल केले होते. जनाबाईंनी आपल्या भक्तीच्या बळावर संतपन हस्तगत केले होते! जनाबाईला श्री विठ्ठल दळू-कांडू लागायचा. गोवऱ्या थापणे, वेचने एवढेच काय झाडून काढल्यानंतर कचरा भरण्याचे काम देव करायचा! हे सारे वचमत्कार बाजूला ठेवून आपण साक्षेपी चिंतन करतांना संत जनाबाईंनी या सर्वच कामात प्रत्यक्ष पांडुरंग पहिला. हाच वारसा पुढे संत गाडगेबाबांनी चालवला. एवढं करूनही जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेतात! त्यांच्या नावावर उनपुरे तीनशे अभंग आहेत.  आत्तापर्यंत त्यांच्यावर दोन-तीन ग्रंथ लिहिले असले तरी ज्या प्रमाणात संत जनाबाई एक विद्रोही, रोखठोक स्त्री संत म्हणून पुढे यायला हवी होती तेवढं काम त्यांच्यावर झालं नाही. आज भावसार समाजाने आपल्या संपूर्ण शक्तीने संत जनाबाईंच्या लेखनाचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन डॉ.जायभाये यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ.रेणुका भावसार, अध्यक्ष श्री जगदीश चव्हाण, श्री द्वारकदास फटाले, श्री गुलाबराव भावसार, श्री लक्ष्मीकांत कंकाळ, श्री अर्जुन पुरनाळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाखेड भावसार समाजातील युवकांनी सहकार्य केले. याप्रसंगी संत जनाबाई प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या