🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी आगामी सणानिमित्त सर्वधर्मियांनी शांतता पाळावी - जिल्हाधिकारी आंचल गोयल


 🌟पशुसंवर्धन विभागाकडून संनियंत्रण अधिकारी नियुक्त🌟

परभणी (दि.२७ जुन २०२३) : जिल्ह्यात एकाच दिवशी बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण येत असून, त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांनी जिल्ह्यात शांततेत सर्व सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

या सणांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच परभणी महानगरपालिकेत शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मनपा प्रशासनाने शहरात २१ ठिकाणी तात्पुरते कत्तलखान्यांचे स्थान निश्चित केले असून, त्याठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ अन्वये जनावरांची कत्तलपूर्व तपासणी साठी जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागाचे ५ सहायक आयुक्त संनियत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली आहे.

शासनाने गाय, गायींचे वासरू, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी व उत्पादक म्हर्शी तसेच रेडे यांच्या कत्तलीस निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा लागू केला आहे. त्याचा भंग झाल्यास १० हजार रुपये दंड व पाच वर्ष कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. या जनावरांच्या वाहतुकीपूर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून आरोग्य तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

बकरी ईद निमित्त अधिसूचित जनावरांची कत्तलपूर्व तपासणी करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत महानगरपालिका प्रशासनाने स्थान निश्चिती केलेल्या ठिकाणी तसेच जिल्ह्यात एकूण ४७ ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातून ५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांची संनियत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तर जिल्हा संनियत्रण कक्ष मुख्यालयात डॉ. पी. आर. पाटील (9422177641) काम पाहतील.

 'बकरी ईद निमित्त दि. २८ जून ते १ जुलैदरम्यान कत्तलपूर्व तपासणी फी ही केवळ २० रुपये आकारण्यात आली आहे. बकरी ईद व आषाढी सणानिमित्त सर्वधर्मियांनी नियमाचे पालन करावे. जेणेकरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या