🌟महाज्योती चालू वर्षासाठी पीएचडी छात्रवृत्तीची जाहिरात लवकर प्रसिद्ध करणार...!


🌟सदर विद्यार्थ्यांना नियमानुसार सहामाही अधिछात्रवृत्तीची रक्कम प्रदान देखील कराण्यात येते🌟

हिंगोली (दि.12 जुन 2023) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर या संस्थेकडून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पीएचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती देण्याची योजना सन 2021 पासून सुरु केलेली आहे. सन 2021 मध्ये 756 उमेदवारांना तर सन 2022 मध्ये 1236 उमेदवारांना अधिछात्रवृती मंजूर करण्यात आलेली आहे व सदर विद्यार्थ्यांना नियमानुसार सहामाही अधिछात्रवृत्तीची रक्कम प्रदान देखील कराण्यात येते. महाज्योती, नागपूर ही संस्था सन 2023 या वर्षासाठी लवकरच पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.

महाज्योती, नागपूर संस्थेने सन 2023 या वर्षासाठी पीएचडी छात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज मागविण्याची जाहिरात तयार केलेली होती, मात्र बाटी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय व अमृत संस्थांमार्फत चालू असलेल्या योजनांचा फेरविचार करणे व कालानुरुप रोजगाराभिमुख धोरण राबविण्यासाठी नवीन धोरण आखणे या सर्व बाबींचा विचार करुन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व संस्थांच्या बाबत एकसमान सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीची बैठक पार पडलेली आहे.

या बैठकीत निश्चित विद्यार्थी संख्या, अर्थसहाय्य स्वरुप, अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून द्यावी की अवार्ड दिनांकापासून द्यावी, तसेच इतर अनुषंगिक बाबीवर सविस्तर चर्चा झालेली आहे. याबाबतचा अहवाल उच्चधिकार समिती मा. मंत्रिमंडळ याना सादर करणार आहे व त्यानुसार पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेत निश्चित विद्यार्थी संख्या, अर्थसहाय्य स्वरुप, अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून द्यावी की अवार्ड दिनांकापासून द्यावी तसेच इतर अनुषंगिक बाबींवर शासन मार्गदर्शक सूचना देणार आहे.

महाज्योतीकडून सन 2023 या वर्षासाठी लवकरच पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यापूर्वी निश्चित विद्यार्थी संख्या, अर्थसहाय्य स्वरुप, अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून द्यावी की अवार्ड दिनांकापासून द्यावी, तसेच इतर अनुषंगिक बाबी निश्चित करणे आवश्यक आहे. या बाबीविषयी शासनाच्या मार्गदर्शक सुचना !  होताच लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. या बाबीचा सुगावा लागल्याने काही व्यक्तींची श्रेयवादासाठी विद्यार्थ्यांना आंदोलनात खेचण्याची तयारी सुरु आहे. जेणेकरून आम्ही आंदोलन केल्याने शासनाने आमची मागणी मान्य केली असे चित्र समाजात पोहचेल आणि श्रेय लाटता येईल अशी या व्यक्तीची भूमिका असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये तसेच व्यक्तिगत स्वार्थासाठी श्रेयवादाची लढाई करणाऱ्या व्यक्तींच्या मागे आंदोलनात फरफटत शैक्षणिक नुकसान करुन घेऊ नये, असे महाज्योती मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये शासनाकडून सर्व समावेशक निकष प्राप्त होताच सन 2023 करिता महात्मा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया महाज्योतीद्वारे सुरु करण्यात येणार आहे, असे आवाहन राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या