🌟‘महाज्योती’च्या पोलीस भरती प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची सुयश....!


  🌟महाराष्ट्र पोलीस दलात १८ प्रशिक्षणार्थ्यांची निवड🌟

परभणी (दि.०५ जुन २०२३) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.

महाज्योती मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात  इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  ६ जानेवारी २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता ५०७ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या ४८२ उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या उमेदवारांना प्रशिक्षणा दरम्यान सहा हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतनही देण्यात आले असून, नुकतेच या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १८ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये परभणीची पल्लवी चिलगर हिचा समावेश असून, याशिवाय जयश्री चव्हाण, राहूल राठोड, रोहिदास खेडेकर, विकास मुंडे, आसाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील, योगेश दारूंटे, जगदीश चव्हाण, सुरज जाधव या इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

महाज्योतीचे अध्यक्ष  तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन महाज्योती, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

________________________________

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत :- मला महाज्योतीच्या सोशल साईटवरून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. ऑनलाईन अर्जप्रक्रिया पार पडली आणि निवड झाल्याचे कळले. मनात थोडी भीती होती. संपूर्ण प्रशिक्षण काळात महाज्योतीकडून मला सहा हजार रुपये विद्यावेतन दिले गेले. विद्यावेतनाची खूप आर्थिक मदत झाली. या शहरात राहण्या-खाण्याच्या प्रश्न मिटला. अतिशय अनुभवी शिक्षकांकडून उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले गेले. कायम लक्षात राहील, अशा शिक्षकांकडून उत्तम प्रशिक्षण दिले गेले. मुलगी म्हणून कुठेही असुरक्षितता वाटू दिली नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमचे प्रशिक्षण पार पडले. आज माझी पोस्टींग लातूर जिल्ह्यात झाली आहे. महाज्योतीने जगण्याचा मार्ग सुकर केला आहे.

पल्लवी चिलगर, चिलगर वाडी, परभणी

--------------------------


घरी कोरडवाहू शेती असल्याने आई-बाबा बाहेर कामाला जायचे. माझे बारावी झाले, तसे मला लवकरात लवकर त्यांना आर्थिक हातभर लावायचा होता. अशात मला मित्राने महाज्योतीच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. मी सर्व सूचनांचे पालन करून ऑनलाईन अर्ज केला. आणि माझी निवड झाली. लगेचच संबोधी अकादमीत माझे मैदानी व लेखी परीक्षेचे क्लासेस सुरू झाले. सोबत सहा हजार रुपये विद्यावेतनही सुरु झाले. विद्यावेतनाची खूप आर्थिक मदत झाली. शहरात राहण्या-खाण्याची सोय झाली. निश्चिंत मनाने अभ्यास करता आला. यशस्वी होता आले. आज मला मुंबईला पोस्टींग मिळाली आहे. मी खूप नशीबवान आहे, मला महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेता आला. आणि माझे भविष्य सुरक्षित करता आले.

राहुल राठोड, सेनगाव, हिंगोली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या