🌟पाऊस लांबला,शेतकऱ्याची चिंता वाढली.....!


🌟खते,बियाणाची खरेदी,पावसाची मात्र हुलकावणी🌟

पुर्णा : परिसरातील शेतकरी उन्हाळ्यातील शेतातील सगळी कामे वेळेत आटोपून खरीप हंगामातील पेरणीसाठी मृग नक्षत्राच्या मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु मृग नक्षत्र आठ जून रोजी सुरू होऊन संपूनही गेले आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरीही पावसाने पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात हजेरी लावली नाही त्यातच तापमानात रोजच वाढ होत असून पाण्याची पातळी ही खालावत चालली आहे पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्याची मात्र चिंता वाढली आहे.


            मागच्या वर्षी मान्सूनचा पाऊस मृग नक्षत्रात झाल्याने वेळेवर पेरणी झाली यंदा मात्र मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरीही पाऊस झाला नाही त्यातच तापमान मात्र चांगले वाढत आहे शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या बोर, विहीर यातील पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे शेतकरी रोजच पाऊस येईल या आशेने आभाळाकडे पाहताना दिसत आहे परंतु पाऊस काही येत नाही पेरणी वेळेवर झाली तर पिके जोरात येतील जनावरांसाठी मुबलक चारा मिळेल व झालेल्या उत्पन्नातून शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा पुढे ढकेल त्यात शिक्षणाचा वाढलेला खर्च आरोग्यावर होत असलेला भरमसाठ खर्च,शेतीतील मजुरांचे वाढलेले पगार,निविष्ठा चे वाढलेले दर याचा ताळमेळ लांबलेल्या पावसाने बसताना दिसत नाही शेतकऱ्याचे सर्व नियोजन खरिपातील पेरणीवरच असते त्यातच सुरुवातीला हवामान अभ्यासकांनी पाऊस वेळेवर येईल व भरपूर होईल पेरणी वेळेत होईल कामाला लागा असे अंदाज दिले. परंतु एकही अंदाज खरा ठरला नाही मात्र या अभ्यासकाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मात्र रात्र - दिवस एक करत सगळी कामे वेगाने यंत्राने करत जमीन वेळेवर तयार केली त्यामुळे  खर्चाचा भुर्दंड मात्र वाढला आधीच शेतकरी अडचणीत त्यात वेळेवर पाऊस येईल या अंदाजाने शेतकरी धावपळ करत सज्ज झाला. बियाणे,खताची खरेदी करून घरात ठेवल्याने  आर्थिक अडचणी सापडला आहे. लांबलेला पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेतकरी आर्थिक गणिताची जुळवा जुळव करण्यासाठी चिंताग्रस्त झाला आहे.

******************************************


पाऊस वेळेवर पडावा यासाठी शेतकरी विविध साकडे घालत आहेत त्यातच कवितेच्या माध्यमातून कवी महेश लांडगे यांनी पावसाला कवितेतून विनवणी केली आहे.

 

"ये रे पावसा"

वाट किती पाहू तुझी रे पावसा

बरसना लवकर,ये रे पावसा


बाप माझा पाही वर सारखा

नको अंत पाहू,तू ये रे पावसा

तापली धरणी पाय भाजे चरा

घशाला कोरड,तू ये रे पावसा


माय ती कासावीस,झाली पावसा

हाती तुझ्या जीव,तू ये रे पावसा

हात जोडले अन् गुडघे टेकले 

हाती तुझ्या फास,तू ये रे पावसा


 ✍️महेश लांडगे

सहायक पोलीस निरीक्षक, नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या