🌟उद्योग वाढीला चालना देण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा देण्यावर भर - उद्योग मंत्री उदय सामंत


🌟हळद क्लस्टरसाठी अतिरिक्त जागाही देवू🌟


नांदेड (दि.08 जुन 2023) :- राज्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसह युवकांना नौकरीची व्यापक संधी निर्माण व्हावी यावर भर देत आहोत. याच बरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त नवउद्योजक निर्माण व्हावेत यावर आमचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. पायाभूत सुविधा कोणत्याही क्षेत्राच्या उद्योग वाढीसाठी आवश्यक असून यादृष्टीनेही टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग भवन येथे जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 यावेळी  खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी धनजंय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे व उद्योजक शैलेश कऱ्हाळे, आनंद बिडवई, बंगाली, महेश देशपांडे व विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. रोजगार निर्मिती व उद्योग व्यवसाय यासाठी आर्थिक बाजूही असावी लागते. युवकांच्या प्रकल्पाप्रमाणे त्यांना वित्त व कर्ज पुरवठा व्हावा यादृष्टीने काही अडचणी असतील तर त्याही प्राधान्याने विचारात घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बँकेचे अधिकारी व नवउद्योजक यांचा समन्वय साधून जागेवरच अडचणी दूर करण्यासाठी मेळावा आयोजित करावा असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत व एमआयडीसीलाही वेगवेगळया पध्दतीने कर द्यावा लागतो याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा सहभाग असलेली समिती नेमण्यात येईल. या समितीच्या निर्णयानुसार उद्योजकांना भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेवर निर्णय घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.  यावेळी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या