🌟परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्यतेसह या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश प्रक्रियेस मंजूरी बहाल करा...!


🌟परभणीकर संघर्ष समितीकडून जोरदार धरणे आंदोलन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर : निर्णायक लढाईचा इशारा🌟

परभणी (दि.19 जुन 2023) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह या शैक्षणिक वर्षापासूनच्याच प्रवेश प्रक्रियेस मंजूरी बहाल करावी, या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीने सोमवार 19 जून रोजी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

              खासदार श्रीमती फौजिया खान, माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार डॉ. मधुसूदनकेंद्रे, अ‍ॅड.अशोक सोनी, तहसील अहमद खान, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. किर्तीकुमार बुरांडे, लाल सेनेचे प्रमुख गणपत भिसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे, संभाजी सेनेचे रामेश्‍वर शिंदे, सोनाली देशमुख, डॉ. सुनील जाधव, राजेश बालटकर,जाकेर लाला, अतिखूर रहेमान खान,डॉक्टर राजगोपाल कालानी, संतोष देशमुख ,माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश देशमुख, सुहास पंडीत, अरुण पवार, राजेश बालटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते.

              या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात जोरदार धरणे आंदोलन करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी द्यावी, या वर्षीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनस्थळी छोटेखानी सभेतून विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत उद्भवलेल्या अडी अडचणींवर जोरदार टिका केली.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत झारीतील शुक्राचार्य हेतुतः अडचणी आणत आहेत. त्याद्वारे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे प्रकार खुलेआमपणे सुरु आहेत. या प्रकारामध्ये भ्रष्ट साखळीच आहे, असा आरोप करीत या संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पदोपदी निर्माण केल्या जाणार्‍या अडीअडचणींवर टिकेचे झोड उठविले. गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून परभणीचे वैद्यकीय महाविद्यालय सर्वार्थाने निकषांना पात्र आहेत, असे असतांनासुध्दा किरकोळ त्रुटी दाखवून परवानगी नाकारण्याचे प्रकार केविलवाणे आहेत. यातून केवळ अर्थपूर्ण हीतच जोपासले जात आहे, अशी टिका संतप्त पदाधिकार्‍यांनी केली. परभणी जिल्हा हा सर्वार्थाने मागास जिल्हा आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरकांच्या हिताकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे नितांत गरजेचे आहे. सरकारी पातळीवरुन सर्व प्रकारचे सकारात्मक अहवाल गेल्यानंतरसुध्दा या महाविद्यालयाच्या स्थापनेस अडथळे निर्माण करण्याचे प्रकार हे एक पडद्याआडील षडयंत्राचाच प्रकार आहे, अशी टिकाही केली. जोपर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळणार नाही, तोपर्यंत परभणीकर संघर्ष समिती स्तब्ध बसणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेने सर्वसामान्य, गोर-गरीब, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणार्‍या व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे झारीतील शुक्राचार्यांनी यात अडथळे आणू नयेत, तसे पाप करु नये, असा इशाराही दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या