🌟सिखलीगर समाजाला मदत करण्यासाठी शासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असे माझे स्पष्ट मत🌟
लेखक : रवींद्रसिंघ मोदी नांदेड
परभणी जिल्ह्यातील ताडकलश तालुक्यात पूर्णा नदीच्या काठी असलेल्या उखळद गाव परिसरात दिनांक 27 मे च्या पहाटे (मध्यरात्री) 3 वाजता सुमारास त्या गावातील नागरिकांनी सामूहिकपणे सिखलीगर समाजातील पंधरा - सोळा वर्षाच्या तीन किशोरवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करून एकास ठार मारलें. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने जरी मराठवाडा हादरून गेला असेल तरी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिनीं मात्र या घटनेच्या गंभीर्याकडे पाठ फिरवली आहे. घटना घडून पाच - सहा दिवस लोटले असले तरी जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार आणि आमदरांनी पीडित कुटुंबियांची सुध घेतलेली नाही. त्यावरुन आपण असे अर्थ काढू शकतो की खरचं परभणी जिल्ह्यातील सिखलीगर समाज हा दुर्दैवी ठरला आहे. सिखलीगर समाजाला मदत करण्यासाठी शासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असे माझे स्पष्ट मत आहे.
त्या रात्री उखळद गाव परिसरात आणि गावात काय - काय घडलं याचं सविस्तर वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतील. रात्रीच्या वेळी मोटर सायकलीवर वराह पकडण्यासाठी जात असलेल्या तीन किशोरवयीन मुलांना (वयोमान 15 ते 16 वर्षे) उखळद गावातील रहिवाशी असलेल्या अकरम पटेल आणि त्याच्या साथीदारांनी आडावलं. त्यांना सविस्तर विचारपूस न करता, तुम्ही चोर आहात म्हणून अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी 40 ते 50 लोकांच्या जनसमुहाने लोखंडी सळी आणि दगड - काठ्यांनी बेदम अमानुषीयपणे मारहाण केली. येथे सामूहिकपणे मारहाण होत असतांना गावातील सरपंचासह सुमारे दो शे जणांचा मानव समूह तमाशा पाहिल्यासारखे सर्व प्रकार पाहत होता. अकरम पटेल व त्याच्या साथीदारांनी जनावरं बांधण्याच्या दोरीने त्या कोवळ्या बालकांना बांधून गावात दिंड काढली. मुलांच्या केशांचे अपमान केले गेले, शीख धर्मात केशांना "ककार" म्हणून धार्मिक मान्यता आहे. त्यावेळी तास दोन तास मारहाण केल्याने आणि मारहाण असह्य झाल्यामुळे किरपालसिंघ पिता सुरजीतसिंघ भोंड (वय 15 वर्षे) याने जागेवरच प्राण सोडला. तर अरुणसिंघ जोगिंदरसिंघ टाक (15) आणि गोरासिंघ उर्फ सचिनसिंघ गुरबचनसिंघ दुधानी हे मारहाणित गंभीररित्या जखमी झालेत.
नंतर ताडकलश पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गंभीर जख्मी दोघा मुलांची हिंसक जमावातून सुटका करून त्यांना परभणी येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे एकूणच रूप पाहता पोलिसांनी तडकाफडकी सहा आरोपींविरोधात हत्येचा गुनाह दाखल केला. पाच आरोपींना अटकही करण्यात आली. पण राज्य शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी मात्र वरील घटनेला गांभीर्याने घेतले दिसत नाही. त्यामुळे गरीब सिखलीगर समाजाची घोर निराशा झाली. गरीब पीडितांच्या पदरी उपेक्षाच आली. पोलिसांनी देखील फक्त सहा लोकांविरुद्ध गुनाह नोंदवून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. वरील घटना का घडली व त्याचे संबंध आणखीनं कुठे जुडलेले आहेत का याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. या घटनेत धार्मिक कोण नाकरणे सुद्धा आरोपींना वाचविण्याचे प्रयत्न असेल. धार्मिक उन्मादाशी निगडित ही घटना असू शकते अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे. एका विशिष्ट धर्माच्या जनसमुहाने केलेली ही मारहाण धार्मिक दृष्टिकोनातून अर्थपूर्ण आहे. वरील बाबत शीख समाजाने संयम पाळून प्रशासनास सहकार्याची भूमिका पाळली आहे.
दुसरं महत्वाचं म्हणजे वरील घटनेचा संबंध वाळू तस्करी विषयाशी तर जुडलेला नाही याचीही चौकशी व्हायला हवी. उखळद हे गाव पूर्णा नदीच्या काठी असून वाळूच्या तस्करीच्या घटनांसाठी हे गाव सतत चर्चेत असते. त्यामुळे येथे घडलेले प्रकार नेमके काय आहे याची चौकशी बारकाईने आणि निष्पक्षपणे झाली पाहिजे अशी सिख समाजाची मागणी आहे. वरील अमानवीय हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी असेही निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आली आहेत. पीडित कुटुंबांना आर्थिक मदत त्वरित देऊन जख्मी मुलांना आर्थिक मदत त्वरित वितरित व्ह्यायला हवी असे सर्वांचे मत आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील गरीब व हलाखीचे जीवन जगणाऱ्या या सिखलीगर समाजाच्या उत्थानासाठी योग्य अशी शासकीय योजना अमलात आणावी. जेणे करून या आधुनिक काळात वराह पालन सारख्या रोजगारातून त्यांची सुटका होऊ शकेल.
परभणी, जालना, नांदेड, बीड, संभाजीनगर जिल्ह्यात सिखलीगर समाजाची संख्या जास्त आहे. सिखलीगर समाज पारंपरिक शेती व गृहकाम औजार बनवून बाजारात विकतो. तसेच वराह पालन, शेळी पालन आणि मोल मजूरीची कामें करतो. परभणी जिल्ह्यात तीन ते चार हजाराच्या संख्येत सिखलीगर समाज वास्तव्यास असेल.....
स. रवींद्रसिंघ मोदी, नांदेड (पत्रकार)
0 टिप्पण्या