🌟प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेत मृग बहारासाठी अर्ज करा....!


🌟पुनर्रचित हवामानावर आधारित विमा योजना : कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन🌟

परभणी (दि.०९ जुन २०२३) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन २०२३-२४ मध्ये राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, परभणी जिल्ह्यात ही योजना मोसंबी, संत्रा, पेरु, लिंबू, डाळिंब, चिकू आणि सिताफळाच्या मृग बहारासाठी राबविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. 

 अधिसूचित फळपिकांपैकी एका पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एका हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येणार आहे. मृग बहारासाठी  तालुकानिहाय महसूल मंडळातील फळपिकांना योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये हेक्टरी २ हजार ७५० ते ८ हजार रुपये हप्ता भरावा लागणार आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत ही फळपिकांनुसार वेगवेगळी आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घेत विहित कालावधीत हप्त्याची रक्कम बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात भरून फळपिक संरक्षित करावे. संत्रा, पेरू व लिंबू फळपिकासाठी १४ जून, मोसंबी व चिकूसाठी ३० जून तर डाळिंबासाठी १४ जुलै आणि सिताफळासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत विमा काढता येणार आहे, असेही त्यांनी आवाहनाद्वारे कळविले आहे. 

जिल्ह्यातील महसुली मंडळनिहाय फळपिक विमासंरक्षण वेगवेगळे आहे. संत्रा पिकासाठी परभणीतील पेडगाव व जांब, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, सावंगी म्हा. बोरी, आडगाव, पाथरी तालुक्यातील पाथरी महसूल मंडळ तर पुर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, ताडकळस, लिमला, पुर्णा आणि कावलगाव, मानवत तालुक्यातील मानवत, कोल्हा, केकरजवळा आणि ताडबोरगाव, आणि सेलू तालुक्यातील सेलू, वालूर, देऊळगाव मात आणि कुपटासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टरी विमा हप्ता भरावा लागणार असून, ८० हजार रुपये प्रति हेक्टरी फळपिकाचे संरक्षण होणार आहे. 

 मोसंबीसाठी परभणीतील परभणी व झरी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर व बोरी, पाथरी तालुक्यातील पाथरी आणि हादगाव बु. महसुली मंडळ, पुर्णा तालुक्यातील चुडावा, लिमला, कावलगाव आणि पुर्णा, मानवत तालुक्यातील मानवत, केकरजवळा आणि कोल्हा, सेलू तालुक्यातील सेलू, वालूर आणि कुपटा महसुली मंडळातील शेतकऱ्यांना ४ हजार रुपये विमा हप्ता भरून मोसंबी पिक प्रति हेक्टरी ८० हजाराचे फळपिकाचे संरक्षण होणार आहे. 

 पेरु फळपिकासाठी परभणी तालुक्यातील परभणी, झरी व टाकळी कुंभकर्ण, पाथरीतील हादगाव बु., सेलूतील सेलू, वालूर आणि मोरेगाव, सोनपेठमधील वडगाव महसुली मंडळांमधील शेतकऱ्यांना हेक्टरी ३ हजार रुपये विमा हप्ता भरून हेक्टरी ६० हजार रुपयांचे पीक संरक्षित करता येणार आहे. चिकूसाठी परभणीतील टाकळी कुंभकर्ण आणि पुर्णा तालुक्यातील पुर्णा महसुली मंडळातील शेतकऱ्यांना त्यांचा चिकू हेक्टरी ३ हजार रुपये विमा हप्ता भरून हेक्टरी ६० हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. डाळिंबासाठी जिंतूर तालुक्यातील चारठाणा व आडगाव आणि सेलू तालुक्यातील सेलू महसुली मंडळाच्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ५०० रुपये भरून १ लाख ३० हजारांचे विमा संरक्षण मिळेल. लिंबू फळपिकासाठी परभणीतील दैठणा, सिंगणापूर, गंगाखेड तालुक्यातील माखणी, पाथरीतील पाथरी, हादगाव बु., बाभुळगाव, पुर्णेतील पुर्णा, सेलू तालुक्यातील सेलू, वालूर, चिखलठाणा, देऊळगाव गात, कुपटा व मोरेगाव आणि सोनपेठ तालुक्यातील आवलगाव आणि शेळगावच्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ५०० रुपये हेक्टरी हप्ता भरून ७० हजार रुपयांचा विमा भरता येणार आहे. 

सिताफळ पिकासाठी परभणी तालुक्यातील पेडगाव व जांब, जिंतूर तालुक्यातील जिंतूर आणि बामणी आणि सेलू तालुक्यातील सेलू, वालूर आणि गोरेगाव येथील शेतकऱ्यांना २ हजार ७५० रुपयांचा विमा हप्ता भरून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी फळपिकांचे संरक्षण होणार आहे. विमा योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, संबंधित तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. लोखंडे यांनी केले आहे.

***** 

वृत्त क्र. 278                                                                                                       दिनांक : ९ जून, २०२३  

              टपाल विभागात विमा सल्लागार पदासाठी २१ जूनला मुलाखती  

•         युवकांनी अर्ज करण्याचे आवाहन

  परभणी, दि.९ (जिमाका): येथील भारतीय टपाल विभागाकडून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागार पदासाठी २१ जून २०२३ रोजी डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी येथे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.  

विमा सल्लागार पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी १८ ते ५० वर्षादरम्यान असावे. अर्जदार हा १० वी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. विमा सल्लागार पदासाठी बेरोजगार, स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट अर्ज करू शकतात.

            उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा, संगणकबाबतचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून भरावी लागेल, ती नॅशनल सेव्हीग्ज सर्टीफीकेट किंवा किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षणानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, तो आयआरडीए (IRDA)ची परवाना परीक्षा उतीर्ण केल्यास कायम केला जाईल. ही परीक्षा ३ वर्षात उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. विमा सल्लागारांची नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्त्वावर राहील.

            तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज २१ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत अधीक्षक डाकघर, परभणी येथे बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे. 

***** 

वृत्त क्र. 279                                                                                                  दिनांक : ९ जून, २०२३  

दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण; ५जुलैपर्यंत अर्ज करा

  परभणी, दि.९ (जिमाका): दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर येथे शिवण, केशकर्तन, कॉम्प्युटर, अकॉउंटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर-कम-फॅब्रीकेटर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहे. यासाठी १८ ते ४० वयोगटातील दिव्यांग पात्र असून, येथे निवास व जेवणाची मोफत सोय आहे. तरी इच्छुकांनी ५ जुलै २०२३पर्यंत वरील पत्त्यावर पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे, अधिक माहितीसाठी ९९६०९००३६९, ९४०३२०७१००, ७३७८६४११३६ आणि ९४२०८४६८८७ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या