🌟 'शासन आपल्या दारी'... मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी मन जिंकले....!


🌟'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही म्हण मोडीत काढत महाराष्ट्रात शिवसेना व भाजप युतीचे सरकार काम करत आहे🌟

'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही म्हण मोडीत काढत महाराष्ट्रात शिवसेना व भाजप युतीचे सरकार काम करत आहे. ११ महिन्यात युती सरकारने भरपूर कामे केलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षात आणखी आम्ही किती कामे करू हे पाहूनच विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, असे दमदार भाषण करून मराठवाड्यातील नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची मने जिंकली. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमामुळे महाराष्ट्रात भाजपा- शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत नक्कीच भर पडणार आहे.  हे यानिमित्ताने मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून आले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील नांदेड येथे 'शासन आपल्या दारी ' या उपक्रमांतर्गत उपस्थिती लावत राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोखा मराठवाड्यातील जनतेसमोर मांडला.  यानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन , अब्दुल सत्तार , उदय सामंत यांच्यासह मराठवाड्यातील अनेक खासदार ,आमदारांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून मराठवाड्यातील जनतेने एक वेगळा आत्मविश्वास अनुभवला. युती सरकारच्या कामामुळे विरोधक धास्तावले आहेत विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले . एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत केंद्रातील भाजप नेत्यांना विरोध करू पाहणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी आपल्या भाषणातून चिमटे घेतले. मोदीविरोधकांनी बैठक पाटण्याला घ्या की चाटण्याला त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगून त्यांनी भाजप व शिवसेना यांचेच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येईल असा विश्वास दर्शविला. तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा देशाला गरज आहे , असे म्हटले. अमेरिकन संसदेत नरेंद्र मोदी यांना एकदा नव्हे तर दोनदा भाषण करण्याची संधी देण्यात आली. अमेरिकेच्या संसदेत बोलण्याची संधी मिळणारे ते भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत, ही गोष्ट अभिमानास्पद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. राज्यातील शेतकऱ्यांकडे शिवसेना- भाजप युती सरकारचे विशेष लक्ष आहे , याचा पुनरुच्चार त्यांनी आपल्या भाषणात केला.‌ ११ महिन्यात शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत सतत शेतीचे नुकसान होते. यासाठी देखील दीड हजार कोटींची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या 'नमो शेतकरी' सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. त्यात राज्य सरकारनेही अधिकचे सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे . यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागच्या सरकारने आपल्या अडीच वर्षाच्या काळात अडवून ठेवलेली कामे या सरकारने खुली केली आहेत. सरकारने २९ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून याचा खर्च १८००० कोटी एवढा आहे. त्यामुळे राज्यातील विविध विकासकामांना एक वेगळी गती मिळाली आहे. आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे घरीच बसून होते. परंतु आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज थेट जनतेपर्यंत व लाभार्थ्यांपर्यंत जात आहेत. हा दोन्ही नेत्यांमधील तुलना करण्याजोगा विरोधाभास आहे , अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे या कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले. मराठवाड्याच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ, मराठवाडा तसेच कर्नाटक येथील प्रमुख रेल्वे मार्गांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहे, असे सांगितले. नांदेड- यवतमाळ- वर्धा तसेच नांदेड- देगलूर- बिदर आणि नांदेड- लोहा- लातूररोड या तिन्ही रेल्वे मार्गांसाठी राज्य शासन आग्रही असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या रेल्वे मार्गांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठवाड्यातील या दौऱ्यामुळे हा भाग पुन्हा एकदा भाजपा- शिवसेना युतीकडे वळला आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघअंतर्गत ५६७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाअंतर्गत शहरातील मलनिःसारण वाहिन्यांच्या बळकटीकरणासाठी तसेच रस्ते विकास कामांसाठी ४३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा समावेश आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मागील नऊ महिन्यात विकासाची जी कामे झाली आहेत व होत आहेत, अशी कामे गेल्या ५० वर्षांत देखील झाली नव्हती, हे विशेष. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीतील विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बालविकास, भूमी अभिलेख, पशुवैद्यकीय, शिक्षण विभाग, मनरेगा, ऊर्जा , सहकार तसेच महिला व बालकल्याण विभाग आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कामांना एक वेगळीच गती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना एकाच छताखाली अनेक सुविधा मिळत असल्याने त्यांचा ताणही खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीच्या मतांच्या टक्केवारीत देखील नक्कीच भर पडणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमावर विरोधी पक्षाने सुरुवातीला टीका केली . परंतु आता विरोधकांचे तोंड देखील बंद झालेले दिसून येत आहे. तळागाळातील नागरिकाला त्यांची शासकीय कामे सोप्या पद्धतीने झाल्यास एक वेगळाच आनंद मिळतो व तोच आनंद महाराष्ट्रातील जनता सध्या अनुभवत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांचे नेते आहेत . तसेच ते घरी बसून नव्हे तर लोकांच्या दारात जाऊन काम करत आहेत, हे त्यांनी 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून सिद्ध करून दाखविले, अशा प्रतिक्रिया मराठवाड्यातील जनतेतून उमटत आहेत .


धन्यवाद साभार : डॉ. अभयकुमार दांडगे

मराठवाडा वार्तापत्र

abhaydandage@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या