🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जास १४ जुलैपर्यंत मुद्दतवाढ....!


🌟या योजनेंतर्गंत सन २०२२-२३ या वर्षासाठी अर्ज भरण्यासाठी ३१ मार्च २०२३ अंतिम दिनांक ठरविण्यात आली होती🌟

परभणी (दि.२३ जुन २०२३) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे, यासाठी ही स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत इयता ११ वी, १२ वी नंतरचे व्यावसायिक,पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्याप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इत्तर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार सलग्न खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

या योजनेंतर्गंत सन २०२२-२३ या वर्षासाठी अर्ज भरण्यासाठी ३१ मार्च २०२३ अंतिम दिनांक ठरविण्यात आली होती. त्यानुसार अर्जही स्वीकारण्यात आले आहेत. मात्र सद्यस्थितीत समाज कल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार स्वाधार योजनेंतर्गत या वर्षासाठी अर्ज भरण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे. सन २०२२-२३ साठी ३१ मार्चपर्येत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी पुन्हा नव्याने या कार्यालयाकडे अर्ज करू नयेत, असेही त्यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या