🌟दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्याकडे महासंघाच्या शिष्टमंडळाकडून मागणी🌟
परभणी (दि.०७ जुन २०२३) : परभणी रेल्वे स्थानकावरुन नवीन रेल्वेगाड्या सुरु करण्याकरीता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने पीट लाईनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापिका निती सरकार यांनी बुधवार ०७ जून रोजी परळी ते परभणी या रेल्वे मार्गाच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने परभणी रेल्वेस्थानकास भेट दिली. त्यावेळी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे,प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, सौ. मंगल मुदगलकर, रुस्तुम कदम, खदीर लाला हाश्मी, दयानंद दिक्षीत, माणिकराव शिंदे व दत्तात्रय कर्हाळे आदींनी व्यवस्थापिका सरकार यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, काही गोष्टींकडे लक्ष वेधले. मराठवाडा विभागातील एक मुख्य जंक्शन आणि संपूर्ण मराठवाडा विभागातील सर्वात जास्त प्रवाशी संख्येचे ठिकाण म्हणून परभणी रेल्वे स्थानक परिचित आहे. या स्थानकावरुन नवीन रेल्वे गाड्यांना सुरू करण्याकरीता ‘पीट लाइन’ची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे म्हटले. तसेच नांदेड-संभाजी नगर तसेच परभणी-परळी वैजनाथ मार्गावर प्रवाशी वाहतूक सुरळीत होण्यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वे प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात यावे, मागील एक वर्षापासून बांधून तयार असलेला ओवर ब्रिज प्रवाशी जनतेसाठी खुला करावा. परळी वैजनाथ येथून येणार्या रेल्वे गाड्यांना परभणी स्थानकावर एक नंबर प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी लूप लाइन निर्माण करण्यात यावी. सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिक्षागृहाचे नूतनीकरण सोबत वातानुकुलीत नवीन प्रतीक्षा गृह निर्माण करावे. परभणी येथे प्रवासी जनतेची सुरक्षा ही एक प्रमुख समस्या असून परभणी स्थानकावर पोलिस स्टेशन निर्माण करण्यात यावे, नांदेड- औरंगाबाद एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यात यावेत, औरंगाबाद-नागपूर, नांदेड-गोवा दरम्यान नवीन गाड्यांना सुरू करण्यात यावे, नांदेड येथून दक्षिण भारताला जोडणार्या सर्व रेल्वे गाड्यांना निजामाबाद ऐवजी परळी-बीदर आणि परळी-कुर्डवाडी मार्गे चालविण्यात यावेत, नांदेड-पुणे आणि नांदेड-पनवेल या दोन्ही रेल्वे गाड्यांत प्रत्येकी पाच अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात यावेत, तंडूरू-परभणी रेल्वेला परतीच्या प्रवासात देखील परभणी येथून सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत....
0 टिप्पण्या