🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद अत्याचार व हत्येतील आरोपींना मोक्का लावा....!


🌟भटके विमुक्त विकास परिषदेची निवेदनाद्वारे मागणी🌟


परभणी (दि.05 जुन 2023)
: अल्पसंख्यांक शिख सिकलकर समाजातील तीन अल्पवयीन बालकांना बेदम मारहाण करणार्‍या व एकाची हत्या करणार्‍या आरोपींना मोक्का लावावा, अशी मागणी भटके विमुक्त विकास परिषदेच्या एका शिष्टमंडळाने केली आहे.               पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उखळद शिवारात डुकरे पकडण्याकरीता हातात जाळी व इतर साहित्य घेवून तीन अल्पवयीन बालके परतत होते, त्यावेळी उखळद येथील काही व्यक्तींनी या बालकांची ओळख किंवा शहनिशा न करता चोर-चोर असे ओरडून बेदम मारहाण केली. त्यात 14 वर्षीय किरपालसिंह भोंड या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गोरसिंह दुधानी व अरुणसिंह टाक या दोघा गंभीर जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

             या घटनेसंदर्भात भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रांतचे कार्यवाह नरसिंह झरे, उपाध्यक्ष उध्दवराव काळे, विभाग समन्वयक शरद दिवे, जिल्हा संयोजक गोविंद भंडे यांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेतली. त्यावेळी मृतक किरपालसिंहच्या आईने र्‍हदय पिळवटून टाकणार्‍या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या की, माझ्या मुलाचा  निर्घृनतेने खून करण्यात आला. त्याला न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही,अन्य हिंदू समाजबांधवही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा आशावाद व्यक्त केला. तर भटके विमुक्त विकास परिषद व अन्य भटके विमुक्त समाज या पिडीत कुटूंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही झरे व इतर कार्यकर्त्यांनी दिली.

           दरम्यान, झरे, काळे, भंडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने परभणी जिल्हा प्रशासनास भेटीनंतर एक निवेदन सादर केले. त्या निवेदनातून त्या मुलांना अमानवीय क्रुरतेने जब्बर मारहाण झाली आहे. त्यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोपींना मोक्का हा कायदा लावला पाहिजे. तसेच पिडीत कुटूंबियांना तात्काळ 25 लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे, त्यांच्या कुटूंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी, जखमीच्या परिवारास 15 लाखाची आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संवेदनशील घटनेची सखोल चौकशी करुन जलदगती न्यायालयात योग्य ती बाजू मांडून पिडीत कुटूंबियांना न्याय मिळावा, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात विवेक विचार मंचचे जिल्हा संयोजक सचिन रासवे, धर्मजागरण विभागाचे संयोजक राजन मानकेश्‍वर, धर्मजागरण मातंग परियोजना जिल्हा संयोजक बालासाहेब राजूरकर, धर्मजागरण मातंग परियोजनेचे जिंतूर संयोजक रोहिदास खंदारे, सामाजिक समरसता मंचचे जिल्हा सहसंयोजक अनंत जोगदंड, मनोज धर्माधिकारी, रघुवीरसिंग जगनसिंग टाक, अर्जूनसिंग सुरतसिंग टाक, नारायण गरुड, डॉ. मोहन चव्हाण, शेरुसिंग भेंड, सुरजितसिंग बावरी, हरदिपसिंग बावरी यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या