🌟हिंगोली जिल्ह्य़ातील कळमनुरीत विजेचा धक्का लागून एकाचा दुदैवी मृत्यू.....!


🌟तर या घटनेत एक जण गंभीर जखमी : वीज कंपनीचे दुर्लक्ष भोवले🌟

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील इंदिरानगर भागात विजेच्या खांबाच्या तणावामध्ये वीज उतरली. याचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. रामराव मारोतराव गवळी (वय 43) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


कळमनुरी येथील रामराव गवळी हे इंदिरानगर भागात मागील काही वर्षांपासून राहतात. त्यांच्या घरासमोरच विजेचा खांब असून त्याचा तणावा त्यांच्या घरात आला आहे. सदर तणावामुळे घरात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता असल्यामुळे रामराव यांनी सदर तणावा काढून घेण्यासाठी विज कंपनीला वारंवार कळविले होते. मात्र, त्यानंतरही वीज कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, रविवारी त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी नातेवाईकांकडे गेल्यामुळे ते घरात एकटेच होते. सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरात आलेल्या तणावामध्ये वीज प्रवाह उतरला. अन् त्याला धक्का लागून रामराव यांचा मृ्त्यू झाला. हा प्रकार शेजारी असलेल्या बाळू पारवे यांना कळाला. त्यांनी रामराव यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या नागरिकांनी विज कंपनीला माहिती दिली. वीज कंपनीने तातडीने वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तणावाला चिटकलेल्या रामराव यांचा मृतदेह बाजूला करण्यात आला. घटनास्थळी कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या