🌟परभणी जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित....!


🌟विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत - सहायक श्रीमती गीता गुठ्ठे

परभणी (दि. 28 जुन 2023) : जिल्ह्यातील मुला-मुलीच्या नऊ शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलीकडून समाज कल्याण कार्यालय अर्ज मागवित आहे. तरी पात्र आणि इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परभणी, मानवत, सेलू व पुर्णा असे एकूण 4 तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, परभणी, मानवत, सेलू, पुर्णा व गंगाखेड असे 5 एकूण 9 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी - विद्यार्थिनींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयांसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणा-या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. 

यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी 12 जुलै 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत. तर इयत्ता 10, 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) 31 जुलै आणि बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी, पदविका (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) अभ्यासक्रमासाठी 31 जुलै आणि व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्यांसाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे सहायक आयुक्त श्रीमती गुठ्ठे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे कळविले आहे.   

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपालाकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय (02452-220595) येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या