🌟नांदेड जिल्ह्यात आदर्श गाव योजनेत गाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन...!


🌟तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन🌟

 नांदेड (दि.14 जुन 2023) :- लोकसहभाग ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आदर्शगाव योजना ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय 10 मार्च 2015 नुसार आधारलेली आहे. इच्छूक गावांनी या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी संबधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

राज्यातील प्रत्येक तालुक्यात लोकांच्या सक्रीय सहभागातून किमान एक पथदर्शक काम करणे व त्यानंतर इतर गावाना त्यांचे गाव आदर्श करण्यासाठी प्रेरीत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. गाव निवडीची पद्धत परिशिष्ट-अ मध्ये नमुद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषानुसार जिल्हा स्तरावर छाननी करुन शिफारस करण्यात येईल. तसेच अंतिम मान्यता कार्यकारी समिती प्रदान करेल.

* निवडीचे निकष :-

गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारचे मिळून 30 टक्क्यापेक्षा जास्त सिंचन क्षेत्र नसावे. या क्षेत्रात कॅनाल आणि लिफट या बाबीखाली भिजणाऱ्या क्षेत्राचा समावेश राहील. गावाची लोकसंख्या 10 हजाराच्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 2 हजार 500 हेक्टरपर्यंत असावे. गटग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्रवाडी / वस्तीस योजनेत सहभागी होता येईल. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्री (नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी (निर्मलग्राम), शेतीसाठी बोअरवेल बंदी (पाण्याचा ताळेबंद), पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे.) विधी ग्राम अभियानात (उदा. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, तंटामुक्त गावे, संत तुकाराम वनग्राम योजना) पुरस्कार प्राप्त गावे सहभाग घेऊ शकतील. गाव विविध ग्रामअभियानात पुरस्कार प्राप्त किंवा गावाचा अशा अभियानात सहभाग असणे आवश्यक आहे. गावास किमान एका अभियानात पुरस्कार प्राप्त असावा तसेच गाव हागणदारी मुक्त असावे.

* प्राधान्यक्रम :-

वरीलप्रमाणे निकष असणाऱ्या गावाच्या निवडीत पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम राहील. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेली गावे. विविध ग्राम अभियानात गावांचा सहभाग. पडीत जमीन, वन जमीन, गायरान जमीन जास्त असणारी गावे. स्थानिक मजूरी कमी असणारी गावे. मृद / जलसंधारणाची कामे काही प्रमाणात झालेली गावे, तथापि मृद व जलसंधारण कामांना 50 टक्केपेक्षा जास्त वाव असणे आवश्यक आहे.

* अर्ज करण्याची पद्धत :-

आदर्श गाव योजनेअंतर्गत समावेश होण्यासाठी इच्छूक गावाने ग्रामसभा बोलावून कार्यकारी समितीने विहीत केलेल्या नमुन्यात आपला अर्ज पुढे नमूद केलेल्या सहपत्रासह जिल्हा समितीमार्फत आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती कार्यालयाकडे सादर करावा. ग्रामसभेची चित्रफित (व्हिडीओ रेकॉर्डिंग). विविध ठराव- ग्रामसभेद्वारे गाव निकडीचे ठराव, संस्था निवडीचा ठराव, सप्तसुत्री अंमलबजावणीचा ठराव, आदर्शगाव ग्राम समितीची निवड, ग्राम कार्यकर्ता निवडीचा ठराव (ग्राम कार्यकर्ता हा संस्थेशी संबधित नसावा.). प्रमाणपत्र- ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र, तलाठयाचे सिंचन व महसुली  क्षेत्र, विविधि ग्राम अभियानातील व गावात राबविल्या जाणा-या उपक्रमाबाबत उपक्रम राबविण्याबाबत येणा-या शासकिय यंत्रणा, कृषि विभागाचे पाणलोट विकास कामास 50 टक्केपेक्षा जास्त वाव असण्याचे प्रमाणपत्र, विविध अभियानात मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्राची सत्यप्रत, ग्रामपंचायताकडून मतदार संख्या प्रमाणपत्र, प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण स्वयंसेवी संस्था असल्यास परिशिष्ठ ब मध्ये नमूद सर्व संबधित प्रमाणपत्रे. प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण शासकिय यंत्रणा असल्यास ग्रामसभेचा ठराव आणि यंत्रणेची तयारी असल्याचे पत्र आवश्यक राहील असेही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या