🌟कृषि विभागाकडून जिल्ह्यातील कृषि केंद्राची तपासणी सुरु आहे🌟
हिंगोली (दि.16 जुन 2023) : सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झालेला आहे. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारे, बियाणे, खते व औषधे इत्यादीची खरेदी सुरु आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेच्या कृषि निविष्ठा उपलब्ध होणे गरजेचे असते. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशके पुरेशा प्रमाणात व योग्य वेळेत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषि विभागाकडून जिल्ह्यातील कृषि केंद्राची तपासणी सुरु आहे.
हिंगोली येथील कृषि केंद्राची तपासणी केली असता त्यामध्ये काही कृषि सेवा केंद्र परवान्यातील अटी , शर्ती तसेच कृषि निविष्ठा कायद्यातील तरतुदीचे पालन करत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी तालुक्यातील 05 कृषि सेवा केंद्राच्या परवान्यावरील कार्यवाहीचा प्रस्ताव परवाना अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने आज दि. 16 जून, 2023 रोजी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी हिंगोलीमधील आराध्या कृषि सेवा केंद्र, रुद्र कृषि केंद्र, किसान केंद्र या कृषि सेवा केंद्राचा खत विक्री परवाना 07 दिवसासाठी तर उदयराज ट्रेडर्स, हिंगोली व तुळजाई कृषि सेवा केंद्र , हिंगोली या कृषि सेवा केंद्राच्या बियाणे विक्री परवाना 10 दिवसासाठी निलंबित केलेला आहे.
तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार अडचण असल्यास तात्काळ कृषि विभाग पंचायत समिती औंढा नागनाथ (मो. 8087889299), कृषि विभाग पंचायत समिती वसमत (मो. 9028905357), कृषि विभाग पंचायत समिती कळमनुरी (मो. 7038473903), कृषि विभाग पंचायत समिती सेनगाव (मो. 9158121718), कृषि विभाग पंचायत समिती हिंगोली (मो. 9405323058) या कृषि विभागाच्या तक्रार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे....
0 टिप्पण्या