🌟परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती निवासी शाळांचे दहावीतील यश.....!



🌟जिल्ह्यातील निवासी शाळेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८१.९१ आहे🌟

परभणी (दि.०६ जुन २०२३) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती मुला-मुलींच्या चारही शासकीय निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळवले असून, विभागाचे सचिव सुमंत भांगे व  आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे आणि सहाय्यक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेच्य इयत्ता १० वीच्या घोषित झालेल्या निकालात निवासी शाळेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८१.९१ आहे. यामध्ये अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा मानवत या शाळेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. या शाळेतील विद्यार्थिनी संध्या दिलीप शेजुळ ही ८१.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तर कु. आळणे स्मृती विलास या विद्यार्थिनीने ७८.६० टक्के गुण घेऊन दुसरी आली आहे. तसेच कु. कुव्हारे प्रिया नाथा या विद्यार्थिनीने ७५.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल ८६.६६ टक्के लागला असून ही शाळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील कु. तेजस राजु सोनवणे या विद्यार्थ्याने ७० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. विश्वदीप प्रकाश वाकळे व कु. यश अर्जुन अंभोरे याने अनुक्रमे ६७.८० व ६७.६६  टक्के गुण घेऊन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे.  

पुर्णा  येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल ७५ टक्के लागला असून ही शाळा जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यवंशी कृष्णा लक्ष्मणराव या विद्यार्थ्याने ७३.२० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सदावर्ते सुरज राजहंस याने ७०.८० तर खंदारे कपिल लिंबाजी याने ६७.४० टक्के घेऊन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.  

सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथील अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचा निकाल ७० टक्के लागला असून मिसाळ वैभव विष्णू हा विद्यार्थी ६९ टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम आला आहे. काटके शुभम भिकाराम हा ५७.४० टक्के तर रणशूर अविनाश याकुळ याने ७७ टक्के घेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. 

सामाजिक न्याय विभागांतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे विभागाचे सचिव सुमंत भांगे व  आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभिनंदन केले असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी सांगितले आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या