🌟मागासवर्गीय दाम्पत्यासाठी राज्य शासनाची ‘कन्यादान योजना’...!


🌟शासन आपल्या दारी उपक्रम सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी व्हा🌟

परभणी (दि.२६ जुन २०२३) : राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागामार्फत विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे व त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ईतर मागासवर्ग प्रवर्गातील मागासवर्गीय दाम्पत्यास आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गंत कन्यादान योजना कार्यरत असल्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी सांगितले आहे.

आर्थिकदृष्‌ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनी आपल्या पाल्याच्या विवाहासाठी अनावश्यक खर्च टाळावा, त्यांनी आर्थि‍क स्थिती उत्तम नसताना अवास्तव खर्च करू नये. यासाठी विविध संस्थांकडून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. या सामुहिक विवाह सोहळ्यांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून राज्य शासनाच्या कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.  

या सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्याच्या पालकांच्या नावे  २० हजार रुपये व स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपयेइतके अनुदान देण्यात येते. यासाठी विवाह आयोजित करणारी संस्था ही संस्था स्थानिक नोंदणी अधिनियम, १९६० सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० अंतर्गत नोंदणीकृत असावी. याकरिता कमीत कमी १० जोडपे असणे आवश्यक आहे. वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये. दोघेही महाराष्ट्रातील रहिवासी असावेत. वधू व वराचे सक्षम प्राधिकारी यांचे जात व रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे चारित्र्य प्रमाणपत्र ई. बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

सन 2023-24 या वर्षासाठी सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी कन्यादान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथील श्री. ए. एम. साखरे यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या