🌟परभणी जिल्ह्याची कायहो ही दैना ? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं अपील पुन्हा फेटाळलं......!


🌟म्हणे दुसरे पुन्हा अपील दाखल होणार : वैद्यकीय महाविद्यालच्या मान्यतेसह प्रवेशास ‘सतराशे साठ’ विघ्न🌟

परभणी (दि.०६ जुन २०२३) : परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह यावर्षीपासूनच्याच प्रवेश प्रक्रियेस हिरवा कंदील मिळावा म्हणून राज्याच्या आरोग्य संचालनालयाने मोठी धडपड करीत नॅशनल मेडिकल कमिशनकडे अपील दाखल केले खरे, परंतु ते अपील मुदतीत दाखल केले नाही,असा ठपका ठेवून या नॅशनल मेडिकल कमिशनने अपील फेटाळून लावले आहे दरम्यान परभणी मेडीकल कॉलेजच्या डीनद्वारे येत्या एक दोन दिवसात नवी दिल्लीतील नॅशनल मेडिकल कमीशनकडे दुसरे अपील दाखल केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

           परभणीच्या मेडीकल कॉलेजला राज्य सरकारने मंजूरी बहाल केली. त्या पाठोपाठ या कॉलेजकरीता जमीन, तसेच पुरेसा निधी  उपलब्ध केला. तसेच पदभरतीकरीता मान्यताही बहाल केली. या दरम्यानच दोन सदस्यीय केंद्रीय समितीने 17 एप्रिल रोजी अचानक या मेडीकल कॉलेजला भेट देवून काही किरकोळ त्रुटींवरच नेमके बोट ठेवून 21 एप्रिल रोजी पत्राद्वारे मान्यतेसह प्रवेश पक्रिया रद्दबातल केली. दोन सदस्यीय समितीने केलेल्या या अर्थपूर्ण खेळामूळे शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली तेव्हा राज्याच्या आरोग्य संचालनालयाने 21 एप्रिल रोजी सर्व त्रुटींची पूर्तता करीत परिपूर्ण असे अपील तयार केले. 29 एप्रिल रोजी ते अपील दाखलही केले. 2 मे रोजी नॅशनल मेडीकल कमीशनकडे ते अपील दाखल झाल्याची नोंद झाली असतांना नॅशनल मेडीकल कमीशनने मुदतीच्या आत हे अपील दाखल झाले नाही, असे कारण दाखवून अपील फेटाळून लावले. या प्रकाराने राज्याच्या आरोग्य संचालनालयाच्या उच्च पदस्त अधिकार्‍यांसह परभणीतील अधिकारीसुध्दा अक्षरशः हादरले. धावपळ करीत चौकशी केली असता नॅशनल मेडीकल कमीशनकडे दाखल केलेल्या अपीलवर 9 मे असा अपील दाखल झाल्याचा दिनांक नोंदवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकाराने उच्चपदस्त व स्थानिक अधिकारी चक्रावून गेले.

            दरम्यान, राज्याच्या आरोग्य संचालनालयास अपील दाखल करण्याचा अधिकार नाही, असाही मुद्दा समोर करीत ते अपील फेटाळल्याची माहिती हाती आली आहे.

           या पार्श्‍वभूमीवर परभणी मेडीकल कॉलेजच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी धावपळ करीत दुसरे अपील दाखल करण्याकरीता दिल्ली गाठली आहे. मेडीकल कॉलेजचे डीन हे दिल्लीत ठाण मांडून बसले असून येत्या दोन तीन दिवसात ते अपील दाखल करणार आहेत.

            दरम्यान, हे दुसरे अपील दाखल झाल्यानंतर त्यावर सूनावनी होईल. त्यानंतर केंद्रीय समितीद्वारे तपासणी होईल, त्यानंतरच मेडीकल कॉलेजच्या मान्यतेसह प्रवेश प्रक्रियेस मान्यता बहाल होईल, हे स्पष्ट आहे. परंतु, या संपूर्ण प्रक्रियेस आणखीन किती कालावधी जाईल? या बाबत संभ्रमावस्था आहे. उच्चपदस्त अधिकारी किंवा स्थानिक अधिकारी या बाबत अंदाज सांगावयास धजावत नाहीत. त्यामुळे  परभणीच्या मेडीकल कॉलेजच्या या वर्षीपासूनच्या प्रवेश प्रक्रियेवर गंडांतर कोसळेल की काय, अशी भिती व्यक्त होत आहे. गंमत म्हणजे या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाची नेतेमंडळी व यासाठी आंदोलन करणारे सारेच आश्‍चर्यकारकरीत्या मौनी भूमिका घेवून बसले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या