🌟विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांमध्ये स्वःजाणीवा जागृत होणे गरजेचे - जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ प्राची साठे🌟


[परभणी: शिक्षण विभाग आयोजित उद्बोधन शिबिराचे उदघाटन करतांना जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ प्राची साठे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड,प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत आदी]

🌟असे मत जेष्ठ शिक्षण तज्ञ तथा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या समन्वयक डॉ प्राची साठे यांनी व्यक्त केले🌟

परभणी (दि.21 जुन 2023) - आजच्या काळातील विद्यार्थ्यांचा मेंदू अत्यंत प्रगत आहे.कुठलंही शिक्षण नसलेलं मूल मोबाईल सारखे तंत्र हाताळत तर त्याला आणखी ज्ञान देण्यासाठी शिक्षकांनी आणखी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एकविसाव्या शतकातील प्रगत शिक्षणासाठी सज्ज असलं पाहिजे.शाळेत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांमध्ये " स्व जाणीव " जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे.शिक्षक जसे आपले कुटुंब जबाबदारीने पुढे नेतो तसे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही शिक्षकाने दक्ष असले पाहिजे.यासाठी शिक्षकांना स्वतः मध्ये मोठा बदल घडवून आणून स्व जाणीवा जागृत होणे गरजेचे आहे,असे मत जेष्ठ शिक्षण तज्ञ तथा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या समन्वयक डॉ प्राची रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने प्रमुख वक्त्या जेष्ठ शिक्षण तज्ञ तथा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या समन्वयक डॉ प्राची रवींद्र साठे यांच्या "स्व जाणिवा विकसित करूया " या विषयावर उद्बोधन शिबिराचे आयोजन आज दि 21 जून रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड,प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे,उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण,डाएटचे प्राचार्य अनिल मुरकुटे तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी दिली.पाहुण्यांचा परिचय उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी दिली.यावेळी प्राचार्य अनिल मुरकुटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलतांना जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ प्राची साठे म्हणाल्या की,शिक्षकांनी सतत प्रवाहात राहिले पाहिजे.उत्तम ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर आधी शिक्षकांनी नवनवीन ज्ञान संपादन करणे गरजेचे आहे.नाही तर विद्यार्थीच आपल्याला बाजूला टाकू शकतात.नकारात्मक वृत्ती या आजाराला आमंत्रण देतात तर सकारात्मक वृत्ती या आनंद देत असतात म्हणून शिक्षकाने सतत सकारात्मक असले पाहिजे.विद्यार्थी हे चंचल असतात.प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो म्हणून शिक्षकाला सर्व विद्यार्थ्यांना समजून घेण्याच कौशल्य सुद्धा जमले पाहिजे.

यावेळी दोन सत्रात हे उद्बोधन शिबीर पार पडले.या दोन्ही सत्रात स्व जाणिवा जागृत करूया या विषयावर डॉ प्राची रवींद्र साठे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शृंगारपुतळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या