🌟पाथरी तालुक्यातील दीड हजार महिलांनी घेतला शिबिराचा लाभ🌟
परभणी (दि.८ जुन २०२३) : राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या समाधान शिबिरातून जिल्ह्यातील ८३७ महिलांशी संबंधित तक्रारी, समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी दिली आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांना सहज, सोप्या पद्धतीने आणि सुकरपणे व्हावा, त्यांना विविध कागदपत्रे एकाच छताखाली मिळावीत. त्यांच्या समस्या जागेवरच सोडविल्या जाव्यात, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. परभणी जिल्हा हे समाधान शिबीर राबविण्यात अग्रेसर राहिला आहे. आतापर्यंत शिबिरात ५ हजार ८१५ महिला सहभागी झाल्या असून ४ हजार ११५ तक्रारींचे अर्ज दाखल करण्यात आले असून, ८३७ अर्जांची जागेवर निपटारा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पाथरी येथील स्त्री शक्ती समाधान शिबिरामध्ये तब्बल दीड हजार महिलांनी सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी १७ मे ते ३१ मे २०२३ या कालावधीत समाधान शिबिरांचे आयोजन केले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर राबविले असून, जिंतूर येथे मंगळवार, दि. १२ जून रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुकास्तरावरच महिलांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात, यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय सर्व विभागातील तालुकास्तरीय विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. महिलेची तक्रार ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाच्या प्रमुखाकडे हस्तांतरित करून या तक्रारीची नोंद ऑनलाईन घेण्यात आली आहे. आता या तक्रारींचा दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे.
या समाधान शिबिरांमध्ये आठ तालुक्यातील ५ हजार ८१५ महिलांची उपस्थिती होती. शिबिरात प्राप्त तक्रार अर्जांची संख्या ४ हजार ११५ आणि जागेवरच समस्या सोडविलेले अर्ज हे ८३७ होते. यामध्ये प्रामुख्याने महिला व बाल विकास विभागाचे बाल संगोपन अनाथ प्रमाणपत्र व कौटुंबिक हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ कायदा इ. योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शिबिर स्थळी विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच यावेळी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणीही करण्यात आली,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी सांगितले......
0 टिप्पण्या