🌟कुंभकर्णाची झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाला प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा...!


🌟तत्काळ मान्सूनपूर्व नाले सफाई करा अन्यथा नाल्यातील गाळ मनपा कार्यालयात टाकू🌟


परभणी (दि.३० मे २०२३) - पावसाळा अवध्या १० दिवसावर आलेला असताना परभणी शहर महानगरपालिकेने शहरातील मुख्य नाल्यांची नाले सफाई अद्यापही सुरु केलेली नाही हि अत्यंत गंभीर बाब आहे. याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे नालेसफाई चे टेंडर आता म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आले. या वरूनच महानगर पालिकेचा भोंगळ कारभार दिसून येतो. साधारणतः मार्च महिन्यात टेंडर काढले जाते व मे च्या च्या पहिल्या आठवडयामध्ये मनपा कडून शहरातील सर्व मुख्य व इतर छोट्यामोठ्या नाल्यांची सफाई केली जाते परंतू में महिना संपला असतानाही आजुनही परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख मोठया पाच नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्यात आलेली नाही.

पावसाळयामध्ये परभणी शहरात पाणी तुंबण्याच्या व लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या अनेक घटना घडत असतात यासाठी शहरातील नाल्यांची सफाई होणे अत्यंत गरचे आहे. शहरातील सर्व प्रमुख व इतर नाल्यांची तत्काळ नाले सफाई करावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनपा प्रशासनास निवेदन देण्यात आले. मनपा प्रशासनाच्या वतीने मनपाचे प्रभारी उपायुक्त मनोज गग्गड यांनी निवेदन स्वीकारले.

शहरातील मुख्य नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून ४-५ फुटांपर्यंत झाडं मुख्य नाल्यांमध्ये साचलेल्या गाळावर उगवली आहेत यावरून नाल्यात साचलेल्या गाळाची कल्पना येते. शहरातील प्रमुख नाल्यांची इतकी गंभीर परिस्थिती असतानाही परभणी शहर महानगरपालिका कुंभकर्णाच्या झोपेत आहे असा आरोप ही यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने केला.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य नाल्यांची तत्काळ नालेसफाई करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वखर्चाने नाले सफाई करून नाल्यातील गाळ महानगरपालिका कार्यालयात आणून टाकला जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, रामेश्वर पुरी, शेख बशीर, बाळा नरवाडे, शेख अल्ताफ, महिला आघाडीच्या सुषमाताई देशपांडे, सोनालीताई गुट्टे, आरतीताई जाधव इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या