🌟कर्करोगाच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजच तंबाखू सेवन सोडा - अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे


🌟असे आवाहन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी केले🌟


परभणी (दि.३१ मे २०२३) : सद्याच्या धकाधकीच्या जीवनात समाजामध्ये जीवघेण्या व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. सिगारेट, बीडी, तंबाखूच्या सेवनामुळे मोठ्या संख्येने नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या अजारांना बळी पडत असून, यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांसोबत ह्रदयरोग रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. या आजारापासून आपली सुटका करुन घेण्यासाठी, तो होण्याअगोदरच त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असून, आजच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सोडून आपले आणि आपल्या कुटूंबाचे जीवन सुखी करा, असे आवाहन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. 

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालय व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय परभणी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको’ या संकल्पनेवर अधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. सुक्रे हे बोलत होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे विधिज्ञ गणेश सेलूकर, तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डॉ. रुपाली रणविरकर, मानसतज्ज्ञ  केशव गव्हाणे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संघई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

केंद्र व राज्य शासनामार्फत तंबाखू सेवन नियंत्रित करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देवून स्वत: तंबाखूचे व्यसन सोडावे तसेच इतरांनाही सोडायला लावावे, असे आवाहन डॉ. सुक्रे यांनी यांनी केले.

तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून आज शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. रॅलीत विविध शासकीय-निमशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसह शासकीय नर्सिंग महाविद्यालय, इंदिरा गांधी नर्सिंग महाविद्यालय, ए.एन.एम. नर्सिग स्कूलच्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांपासून लोकांची जनजागृती करण्यासाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या सर्व पोस्टरचे प्रदर्शन जिल्हा रुग्णालयातील ओपीडी हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. यावेळी रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाहीर काशिनाथ उबाळे यांच्या कलापथकाने तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांची मनोरंजनाच्या माध्यमातून माहिती देत आजच तंबाखू सेवन सोडण्याचे आवाहन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या