🌟स्त्री रुग्णालयामुळे मातांना आरोग्यसुविधा उपलब्ध - पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत

           


🌟पालकमंत्र्यांच्या हस्तेा १०० खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण🌟   


परभणी (दि.२६ मे २०२३) : जिल्ह्यातील माता व बालकांना उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नाही. स्त्री रुग्णालयामुळे आजपासून आरोग्यविषयक सोयीसुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या दर्गा रोड परिसरातील स्त्री रुग्णालयाचे आज डॉ. सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

            केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना साकोरे –बोर्डीकर, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, आरोग्य उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कालिदास चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते आदी उपस्थित होते. 

             जिल्ह्यातील माता व नवजात बालकांचे उपचाराअभावी होणारे मृत्यू आता स्त्री रुग्णालयामुळे टाळता येणार आहेत. राज्य शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ मातांना होणार असून, आजपासून रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे त्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत असल्याचा आनंद होत असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 

            राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मात भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचे सांगताना माता सुरक्षित, घर सुरक्षित, जागरुक पालक, सुदृढ बालक, सुंदर माझा दवाखाना आदी योजना यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत. आता शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. राज्यात झोपडपट्टी भागातील स्लम दवाखाने नियमित केले असून, अनेक शासकीय रुग्णालयांच्या वेळा रुग्णांच्या सोयीसाठी बदलल्या असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.  

 जिल्ह्यातील आरोग्य सेवा उंचवण्यासाठी येथील सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी येथे प्रत्यक्ष काम करणा-या व्यक्ती सर्वात महत्त्वाच्या आहेत. राज्यात सन २०२२-२३ मध्ये आरोग्य यंत्रणांना विविध योजना राबविण्यासाठी निधी आवश्यक होता. तो मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सतत पाठपुरावा केला. माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी हे रुग्णालय होणे आवश्यक होते, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी खासदार संजय जाधव, आमदार श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. यावेळी रुग्णालय परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या