🌟सफाई कर्मचारी संघटनांनी आयोगाला घटनांची तात्काळ माहिती द्यावी - एम व्यंकटेशन


🌟कंत्राटी व कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची ऐकली गाऱ्हाणी : जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना🌟


परभणी (दि.२४ मे २०२३) : राज्यात सफाई कर्मचाऱ्यांसोबत घडणाऱ्या दुर्घटनेबाबत संघटनांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या संपर्कात राहून वेळोवेळी याबाबत तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.  


व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिलहा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे आदी उपस्थित होते.

 श्री. व्यंकटेशन यांनी सकाळी सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे जावून मृत सफाई कर्मचा-यांच्या वारसांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले. त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

भाऊचा तांडा येथील घटनेबाबत राष्‌ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने स्वत: दखल घेतली. मात्र, सफाई कर्मचारी संघटनांनी याबाबत आयोगाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी यापुढे आयोगाच्या सतत संपर्कात राहून घटनांबाबत अवगत करण्याचे आवाहन श्री. व्यंकटेशन यांनी केले. तसेच सफाई कर्मचारी व संघटनांना भेडसावत असलेल्या तक्रारींबाबत आयोगाकडे निवेदने सादर केली आहेत. याशिवाय कर्मचार्ऱ्यांची निवेदने अथवा तक्रारी असल्यास त्यांनी त्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे लेखी कळवाव्यात. आयोग लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत कळविणार असल्याचे सांगितले. तसेच बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्यात येणारे कर्मचारी, कंत्राटी आणि कायमस्वरुपी कार्यरत कर्मचा-यांच्या समस्यांबाबत माहिती घेत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आढावा बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे किमान सन्मानजनक आणि नियमित वेतन मिळावे, या मागणीबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी आयोगाच्या अध्यक्षांचे लक्ष वेधले असता, अशा कर्मचाऱ्यांबाबत राष्ट्रीय आयोगाकडून राज्य आयोगाला पत्र लिहून होणा-या आर्थिक शोषण केल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

 जिल्ह्यातील सफाई कर्मचा-यांच्या रजा, वेतन, त्यांना शासनाकडून मिळणारे लाभ, योजना, विविध वैद्यकीय सोयीसुविधा, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी केली जाणारी तजवीज, घरकुल योजना, विमा योजना आदींबाबत जनजागृती करण्याच्या सूचना श्री. व्यंकटेशन यांनी केल्या.  त्यावर जिल्ह्यातील महानगरपालिका आणि सर्व नगर परिषदांना विविध योजनेसह इतरही घरकुल योजनांचा महिन्याभरात अहवाल आणि प्रस्ताव पाठविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

  कर्मचाऱ्यांना मशीनने मैला साफ करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी आयोगाकडे पाठवावेत. आयोग ते प्रस्ताव विविध कंपन्यांना पाठवेल आणि त्यांच्या सीएसआर फंडातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मशीन उपलब्ध करून दिल्या जातील, असे श्री. व्यंकटेशन यांनी सांगितले.

  मनपातील कर्मचा-यांनी त्यांना नियमित वेतन नसल्यामुळे आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्या कामाबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर मनपा सफाई कर्मचा-यांना एप्रिल महिन्याचे वेतन लवकरच करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे नियमित वेतन देण्याचा महानगरपालिका प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती सांडभोर यांनी सांगितले. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले. तर समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील सफाई कर्मचारी आणि संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या