🌟अनेक भाषांचे विद्याविशारद : छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज.....!


🌟धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले महाराज जयंती विशेष🌟

    अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती शंभूराजे हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण- राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील छ.शिवाजीराजे यांचा उल्लेख केला आहे-

   "कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः।

   जगत: पतिरंशतोवतापो: तीर्ण:स शिवछत्रपति जयत्यजेयः॥"

अर्थ- कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास! तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास॥ याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले.

     संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री- ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणत त्यांना दरसाल दहा हजार पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाका रोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि.२४ ऑगस्ट १६८०- भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२ रोजी केले आहे. दानपत्र तीनशे सेमी लांब आणि २३.५ सेमी रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजीराजांची सोळा बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये दोन ओळी लिहिल्या, त्या दस्तूरखुद्द शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत-

    "||मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज||

     छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं||छं||श्री||"

यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात. तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण तसेच 'हैन्दवधर्म जीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी धर्माचा जीर्णोद्धार करणारा, असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनीहह म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले, असा करतात. यावरून छ.शंभूराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.

    छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छ.शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे  चिरंजीव, ज्यांना शिवरायांचा छावा म्हणून देखील संबोधल जाते. असे युगधुरंधर महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी राजे भोसले होय. त्यांचा जन्म दि.१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. ते राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले. त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन ते लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूधआई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाऊ यांनी केला. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खुप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ बाल शंभूंनी सोसू नये, म्हणून त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा शंभूराजेंच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले. छत्रपतींची राजमुद्रा व दानपत्र असे होते-

    "श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते| 

     यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि||"

अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.

   दि.६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजेंनी गोपाळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे- "राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे, ते चालवावे; हे आम्हास अगत्य..." युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला, तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही त्यांचाच ठसा उमटलेला आढळतो. त्यांनी संतजनांस राजाश्रयही असा दिला- १. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. २. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. ३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु.१ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. ४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. ५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई- वणी छ.शिवरायांप्रमाणेच त्यांनी पण माफ केली. ६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे. ७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना.. जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे. ८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे. शंभू महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला होता.  

   छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारे अंगभाडे कर त्यांच्या आज्ञेने माफ करण्यात आले. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात त्यांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास कर माफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून कोरले-

  "आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन... 

   पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे, 

   सहसा धर्मकृत्यास नाश करू नये. 

   करतील त्यांसी महापातक आहे..."

    इ.स.१६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. दि.१ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून ते रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही ते शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभूराजेंना व त्यांच्यासोबत असलेल्या कविराज  कलश यांनाही जिवंत पकडले.

     त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड आताचे धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने छत्रपती आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. तरीही राजेंनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. त्याप्रमाणे डोळे फोडले, कानात तप्त शिसे ओतले, हातपाय तोडले, जीभ ओढून कापली, तरीसुद्धा संभाजी महाराजांनी हार मानली नाही. असा अनन्वित छळ करून शेवटी त्यांचा दि.११ मार्च १६८९ रोजी शिरच्छेद करण्यात आला. तुळापूर येथे त्यांनी एका मराठमोळ्या मुलूखासाठी हौतात्म्य पत्करले.


!! अजित-ए-जंग न्युज परिवारातर्फे त्यांच्या जयंती सप्ताहाच्या पावन पर्वावर त्यांना विनम्र अभिवादन !!

 श्री के. जी. निकोडे- 'केजीएन'

   मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.

   ता. आरमोरी, जि. गडचिरोली. 

   फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या