🌟परभणी जिल्ह्यातील दिव्यांगाना प्रमाणपत्र काढून घेण्याची सुवर्णसंधी.....!



🌟शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गंत विशेष शिबिरांचे आयोजन🌟 

परभणी (दि.२५ मे २०२३) : राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गंत जिल्हा प्रशासनाकडून  जिल्ह्यात १०० दिवस दिव्यांगांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र काढून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून, जिल्ह्यातील दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मधील प्रकरण १० मधील कलम ५६,५७,५८, मधील तरतुदीनुसार दिव्यांगांना केंद्र, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी वैश्विक ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अनुदानित दिव्यांग शाळेतील कर्मचारी, पंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात ‘१०० दिवस दिव्यांगासाठी’ हे विशेष अभियान १ एप्रिलपासून राबवण्यात येत आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय जिंतूर, सेलू व गंगाखेड येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून दिव्यांगत्व प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड वितरीत करण्यात येत आहेत. यासाठी प्रथम दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयातील डाटा ऑपरेटरच्या मदतीने किंवा स्वतः www.swavalambancard.gov.in या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करावी व प्राप्त झालेली पावती घेऊन अस्थिव्यंग प्रवर्गाच्या दिव्यांग व्यक्तींनी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सदर पावती सादर करून रीतसर तपासणी करून घ्यावी. 

इतर प्रवर्गाच्या दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा रुग्णालय परभणी येथे सदर पावती सादर करून रीतसर तपासणी करून घ्यावी. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिव्यांगत्व प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड प्राप्त करून घ्यावे. तसेच तालुकास्तरीय शहरी तसेच परभणी शहरातील दिव्यांग व्यक्तींनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून पावती रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय येथे सादर करून तपासणी करुन घ्यावी व आपले दिव्यांगत्व प्रमाणपत्र व कार्ड प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या