🌟वाशिम येथील 'राजस्थान आर्य कला महाविद्यालयात' चर्चासत्र संपन्न.......!


🌟या चर्चासत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून गोटे महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.वेदप्रकाश डोणगावकरांची उपस्थिती🌟 


वाशिम (दि.०९ मे २०२३) - वाशिम येथील राजस्थान आर्य कला, महाविद्यालयाच्यां तत्त्वज्ञान विभाग व  IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामानुजन सभागृहामध्ये आज मंगळवार दि.०९ मे २०२३ रोजी "धार्मिक सुसंवाद विकसित करण्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका" या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रामध्ये मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, वाशिम येथील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. वेदप्रकाश डोणगावकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून, आज सर्वत्र धार्मिक सद्भावना संपुष्टात येत असल्यामुळे नव्याने धर्माच्या अभ्यासाची गरज असल्याचे मत प्रतिपादित केले. 


आज समाजामध्ये मूल्यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. मुलांमध्ये पालकांविषयी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आणि नागरिकांमध्ये समाजाविषयी कृतज्ञता भाव राहिलेला नाही. म्हणून वेदांमध्ये सांगितलेले ऋण पुन्हा समाज मनात रुजविणे काळाची गरज बनली आहे. आज समाजामध्ये अप्रमानिकपणा,  भ्रष्टाचार, व्याभिचार फोफावत असल्यामुळे जैन धर्मात सांगितलेली महाव्रत आचरणात आणणे आवश्यक बनले आहे. या भारताच्या भूमीवर बुद्धा इतका शांत माणूस कधीही जन्मला नाही, आणि असे असताना याच भारतात हिंसाचार घडत राहतो हे दुर्दैवी आहे. तेव्हा बुद्धाच्या त्या शांतीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणे सुद्धा काळाची गरज बनली आहे. मुळात आपल्या भारतीय धर्मांमध्ये नीतिमूल्य, सामाजिक सद्भावना, आत्मकल्याण, मानवताद सांगितलेला आहे. "वसुधैव कुटुम्बकम" चा नारा देत भारतीय धर्मानी संबंध विश्वाला बंधुत्वाचा उपदेश केला आहे. परंतु भारतीय म्हणून आपण या सर्व धर्मांकडे कधीही व्यापक दृष्टिकोनातून पाहिले नाही; किंबहुना तशा प्रकारचा संस्कारही आपल्याकडे झाला नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी आपण ज्या धर्मात जन्मलो आहोत त्या धर्मासह इतर सर्व धर्माचा देखील अभ्यास केला पाहिजे; असे आवाहन डॉ. वेदप्रकाश डोनगावकर यांनी उपस्थितांना केले.  


आज आपल्याकडे राजकारणाच्या माध्यमातून धर्माचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावला जात आहे आणि एका अर्थाने त्यातूनच धार्मिक तेढ, जातीय दंगली घडताना आपण पाहत आहोत. मुळात प्रत्येक धर्म चांगला आहे. तो चांगुलपणासाठीच असतो. तेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक धर्माचे मूळ साहित्य वाचले पाहिजे, प्रत्येक धर्माचे मूल्य व तत्व आचरणात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यातूनच समाजाला नवीन दिशा दिली पाहिजे. हीच आजच्या तरुणाईची, प्रामुख्याने विद्यार्थ्यांची भूमिका असली पाहिजे; अशी अपेक्षा डॉ. वेदप्रकाश डोनगावकर यांनी यावेळी व्यक्त केली.

या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत वंजारी यांनी भूषविले. प्रस्तुत चर्चासत्रात महाविद्यालयातील IQAC समन्वयक डॉ. राजेश मस्के, मराठी विभाग प्रमुख प्रा. ज्योत्सना जोशी यांनी उपस्थित राहून यथोचित मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे डॉ.सुभाष जाधव, डॉ. प्रमोद धनविजय हे देखील आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे या चर्चासत्रामध्ये सर्व शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या  कार्यक्रमाचे आयोजन हे महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. आर. एफ. पगारिया यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील  तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम वानखडे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या