🌟सारथी संस्थेमार्फत मराठा,कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्रधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन...!


🌟आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक 'सारथी' तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे लातूर यांनी केले🌟 

परभणी (दि.२० मे २०२३) :  शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, एमपीएससी- युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयंरोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी व कृषीपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्याचे कामकाज सारथी संस्थेमार्फत केले जाते. या सर्व योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक 'सारथी' तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे लातूर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सारथी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून सारथी संस्थेचे लातूर विभागीय कार्यालय - जुने जिल्हालधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे सुरु झालेले आहे. सारथी लातूर विभागीय कार्यालयांतर्गत लातूर, परभणी, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे.      

लातूर, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाज बांधवांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागीय कार्यालयाचे प्रमुख व सारथी संस्थेकडून करण्यात येत असल्याचे परिपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या