🌟कृषी विद्यापीठाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर : आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली माहीती🌟
परभणी (दि.२८ मे २०२३) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २५ एकर जागेमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मांडला असुन तो ठराव एकमताने मंजूर झाला आहे.
सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी नाट्यगृह निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे ग्रंथालय तसेच क्रीडा क्षेत्रातील खेळाडुंसाठी सर्व सुविधांनी युक्त असे जिल्हा क्रीडा संकूल व्हावे यासाठी आ.पाटील वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. या अनुषंगाने मागील वर्षी कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी २५ एकर जागेची मागणी आमदार पाटील यांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत जिल्हा क्रिडा संकुलासाठी २५ एकर जागेचा ठराव मंजूर करून घेत तो शासनाकडे पाठवला होता. त्याचा पाठपुरावा केल्यामुळे शासनाने या ठरावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा क्रीडा संकुलाचे काम सुरू होणार आहे.
दरम्यान नुकतीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत परिषदेचे सदस्य आमदार पाटील यांनी विद्यापीठात होत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे परभणी जिल्हा क्रिडा संकूल असे नाव देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला परिषदेने एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे नवे क्रीडा संकुल आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे परभणी जिल्हा क्रीडा संकुल म्हणून ओळखले जाणार आहे.
0 टिप्पण्या